उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील पाणजे येथील समुद्र किनार्यांचे काही समाज कंटकांनी पाणथळी जवळील व फ्लेमिंगा पक्षांचे आश्रयस्थान असलेल्या गवताळ आणि झाडा-झुडपांना आग लावून येथील पक्ष्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथील जैवविविधता आणि पक्ष्यांचे निवास धोक्यात आले असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी या येथील गवताला आणि झाडा झुडपांना आग लावण्याचा प्रकार घडला होता. नॅटकनेक्ट फाऊंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानने या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. सिडकोने नवी मुंबई एसईझेडला वेटलँड दिल्याचा भाडेतत्त्वाचा करार रद्द करण्याची विनंती नॅटकनेक्टतने मुख्यमंत्र्यांंना केली आहे.
वेटलँडची नासधुस करण्याचे हे न थांबणारे प्रयत्न चिंताजनक आहेत, असे श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी म्हटले आहे. 289-हेक्टर जागेसाठी पाण्याचा प्रवाह बंद केला जातो त्यामुळे येथील मासे तसेच पशुपक्षी आणि जमीन कोरडी होते. ऑक्टोबर ते मे या कालावधीत सुमारे 50 प्रजातींचे देशी विदेशी पक्षी या पाणथळ प्रदेशात येतात. हिवाळा संपेपर्यंत आणि पावसाळ्याची चाहूल लागेपर्यंत हे पक्षी इथेच थांबतात. मात्र काही समाजकंटक या पक्षांना हुसकावण्यासाठी आणि येथील जमिन ताब्यात घेण्यासाठी अघोरी प्रयत्न करत आहेत. या बाबत रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना देखिल या आगीचे फोटो पाठविण्यात आले असून त्यांनी आपल्या विभागाकडून या बाबत लक्ष घालण्यास सांगितले आहे.
दहा दिवसांपेक्षा कमी कालावधीत मुख्यमंत्र्यांकडे केलेली ही तिसरी तक्रार आहे आणि या सर्व तक्रारी पर्यावरण विभागाकडे कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पर्यावरण विभागाने वेळीच या पाणथळ जागा वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.
-बी. एन. कुमार, संचालक, नॅट कनेक्ट