नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
टीम इंडियाच्या टी-20 संघाचे कर्णधार रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आता विराट कोहलीसोबत एकदिवसीय संघाच्या नेतृत्वासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय कोहलीला एकदिवस संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्याची शक्यता आहे. विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी असल्याने त्याच्यावर दबाव असून त्याने पूर्वीच्या फॉर्मात यावे यासाठी बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकते. दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेनंतर एकदिवस संघाच्या नेतृत्वात बदल केले जाऊ शकतात. 11 जानेवारी 2022पासून ही मालिका सुरू होणार आहे. टी-20प्रमाणे एकदिवसीय संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे, तर के. एल. राहुलला उपकर्णधार केले जाऊ शकते.
टी-20 वर्ल्डकपमध्ये निराशा
विराट कोहलीच्या नेतृत्वात टी-20 वर्ल्डकपसाठी खेळणार्या भारतीय संघाने चाहत्यांची मोठी निराशा केली आहे. पहिल्याच दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे भारत उपांत्य फेरीदेखील गाठू शकला नाही. विराटच्या नेतृत्वात भारताने 2017 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली होती, पण कर्णधार म्हणून कोणतीही मोठी स्पर्धा तो जिंकू शकलेला नाही.