दुबई ः वृत्तसंस्था
टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 14) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. हा सामना दुबई येथील स्टेडियमवर खेळला जाईल. यानिमित्ताने या स्पर्धेला यंदा नवा विश्वविजेता मिळणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मात देऊन अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे अंतिम लढत चुरशीची होईल, अशी चिन्हे आहेत. या स्पर्धेच्या दोन्ही उपांत्य फेरीत संघांना विजयासाठी शेवटच्या पाच षटकांत 60हून अधिक धावा करायच्या होत्या, पण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी एक षटक आधीच लक्ष्य गाठले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेवटची दोन षटके बाकी असताना दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी 22 धावा हव्या होत्या. तरीही सामना 19 व्या षटकातच संपला. आता उभय संघांना पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याची समान संधी आहे. जर न्यूझीलंडचा संघ विजेता ठरला, तर एकाच वर्षात दोन आयसीसी जेतेपदे जिंकणारा तो पहिला संघ ठरेल.