25 नोव्हेंबरला महाबलीपूरममध्ये होणार प्रदान
मुंबई : प्रतिनिधी
नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा आठवा सीएसआर इंडिया पुरस्कार- 2021 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) मिळाला आहे. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल महापारेषणला कोरोना योध्दा या गटात हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे महापारेषणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी तमिळनाडूमधील महाबलीपूरम येथे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
कोरोना महामारीमध्ये कंपन्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. महापारेषण कंपनीने राज्य आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दोन कोटींचा निधी दिला. तसेच विदर्भातील कोविड-19च्या रूग्णांना आरोग्य सुविधा व उपचार मिळण्यासाठी विदर्भ रिलीफ कमिटी, विभागीय आयुक्त नागपूर, अमरावती व नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून 200 लसीकरण व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या.
यासाठी पंचवीस कोटींचा खर्च आला. या 200 लसीकरणाच्या व्हॅन विदर्भातील दुर्गम भागातील खेड्यापाड्यात लसीकरणाची सुविधा पोहचविण्यासाठी तसेच समाजातील दुर्बल घटक, गर्भवती महिला, दिव्यांग, वृध्द व्यक्ती तसेच इतर आजाराने ग्रासलेले जे लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांना लसीकरणाची सुविधा पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. तसेच नागपूर शहरातील कोविड-19च्या गरीब व गरजू रूग्णांना दोन कोटींच्या आरोग्य सुविधा व उपचार करण्यात आले. या पुरस्कारामुळे कंपनीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
ऊर्जा क्षेत्रात महापारेषण कंपनी मोठी भूमिका बजावत आहे. कोविड-19च्या महामारीमध्येही कंपनीने सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजातील गरीब व गरजू रूग्णांना आरोग्य सुविधा व उपचार देण्याचे काम केले आहे. कर्मचार्यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम महापारेषण ॠसीएसआरॠ च्या माध्यमातून करीत आहे.
-दिनेश वाघमारे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण