कोरोनाला रोखण्यासाठी सतर्क
पेण ः प्रतिनिधी – पेण तालुक्यात महसूल, पोलीस, आरोग्य व नगर परिषद, पंचायत समिती हे प्रशासनाचे प्रमुख असलेले विभाग हातात हात घालून काम करताना दिसत आहेत. या विभागांतील उत्तम समन्वयामुळे पेण तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
पेणच्या उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस, आरोग्य, नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी योग्य प्रकारे काम करताना दिसत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व विविध विभागांतील कामगार स्वच्छता तसेच जनजागृतीचे काम करीत आहेत. पंचायत समितीत गटविकास अधिकारी सी. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक सहाय्यक गटविकास अधिकारी, दोन विस्तार अधिकारी, 52 ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सरपंच कार्यरत आहेत.
महसूल विभागात तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीन नायब तहसीलदार, 26 तलाठी, त्यांचे कारकून हे ग्रामीण भागाबरोबर शहरी भागाकडेही लक्ष ठेवून आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत नऊ डॉक्टर्स, 170 कर्मचारी आणि 147 आशा वर्कर ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवत आहेत, तर शहरात वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांबाळे यांच्या नेतृत्वाखाली सहा डॉक्टर्स आणि 39 कर्मचारी आरोग्यसेवा पुरवत आहेत. पेण तालुक्याचा विचार करता आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही.