पंजाबचा 17 धावांनी पराभव
बेंगळुरू : वृत्तसंस्था
एबी डिव्हिलियर्सच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 17 धावांनी विजय मिळवला. बुधवारी आयपीएल क्रिकेट सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 203 धावांचे लक्ष्य ठेवले.
चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 202 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्याच षटकात शमीने कर्णधार विराट कोहलीला बाद करत ‘बेंगळुरू’ला पहिला धक्का दिला. त्यानंतर डिव्हिलियर्स आणि पार्थिव पटेल यांनी ‘बेंगळुरू’ला अर्धशतकी टप्पा पार करून दिला. सातव्या षटकात अश्विनने पार्थिवला बाद केले. पार्थिवने 24 चेंडूंत सात चौकार आणि 2 षटकारांसह 43 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या मोईन अलीला (3 धावा) अश्विनने, तर आकाशदीप नाथला हार्दूसने बाद केले. त्यामुळे नवव्या षटकात ‘बेंगळुरू’ची 4 बाद 81 अशी स्थिती झाली होती. त्यानंतर डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टोइनिस यांनी फटकेबाजी करत ‘बेंगळुरू’ला द्विशतकी टप्पा पार करून दिला. त्यांनी 66 चेंडूंत 121 धावांची अभेद्य भागीदारी रचली. डिव्हिलियर्सने 44 चेंडूंत 3 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 82 धावांची, तर मार्कसने 34 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 46 धावांची खेळी केली.
बेंगळुरूने दिलेल्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या दोघांनीही आक्रमक सुरुवात केली, पण या दोघांनाही फार चमकदार कामगिरी करता आली नाही. लोकेश राहुलने 27 चेंडूत 42 धावा केल्या, तर गेलने 10 चेंडूत 23 धावा काढल्या. ही जोडी बाद झाल्यावर आलेल्या डेव्हिड मिलर आणि निकोलस पूरन यांनी चांगली भागीदारी केली.