श्रीवर्धन : प्रतिनिधी
एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे श्रीवर्धन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे राज्यातील शाळा जवळ जवळ दोन वर्षे बंद होत्या. नुकताच शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात झाली होती, परंतु एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यामुळे खेडेगावातून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. काही विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात पोहोचू शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. श्रीवर्धन शहरातील राऊत विद्यालय, गोखले महाविद्यालयात ग्रामीण भागातून शेकडो विद्यार्थी येत असतात. त्यांच्यासाठी एसटी महामंडळाच्या विशेष फेर्यादेखील सुरू असतात, परंतु एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील ग्राहक श्रीवर्धनमध्ये येत नाहीत, त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे. ग्राहकच नसल्यामुळे व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे.