पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरातील कामोठे, कळंबोली, खारघर आणि येथील परिसरातील गावागावांमध्ये लूटमारीसह चोरी, चेन स्नॅचिंग अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या घटनांच्या उकली होण्याचेप्रमाण त्याप्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पनवेल परिसरात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत.
पहिल्या घटनेत पनवेल जवळील मुंबई ते गोवा मार्गावरील आगरी कट्टा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून जवळपास 16 हजारांचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने आगरी कट्टा हॉटेलच्या स्लायडिंग खिडकीच्या उघड्या दरवाज्यावाटे आत प्रवेश केला व त्याठिकाणी असलेले वेल्डिंग मशीन, ग्राईंडर मशीन, ड्रिल मशीन व वेल्डिंग केबल, असा मिळून जवळपास 16 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात
आली आहे.
दुसर्या घटनेते एका 70 वर्षीय वृद्ध महिलेस फसवून तिच्याकडे असलेले जवळपास एक लाख 80 हजारांचे सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना पनवेल शहरातील टपाल नाका येथील शनी मंदिराजवळ असलेल्या रिक्षा स्टँड तसेच बेथल प्रार्थनालयाजवळ घडली आहे. यमुना वास्कर (वय 70, रा. कुंडेवहाळ) या चिखले येथे राहणार्या त्यांच्या मुलीस भेटण्यासाठी जात असताना टपालनाका परिसरात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन तुम्हाला 1700 रूपये मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी तुमच्या अंगावर असलेले दागिने काढून पाकिटात ठेवून द्या व ते पाकीट तुमच्या पिशवीत ठेवा असे सांगितले. यानंतर दोघांपैकी एका व्यक्तीने त्यांना हजार रूपये दिले तसेच पाकीट असलेली पिशवी त्यांच्या हातात दिली व आम्ही लगेच येतो असे सांगून ते निघून गेले. काही वेळाने महिलेने पिशवी तपासली असता त्यात दागिने आढळून आले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक लक्षात येताच महिलेने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली.
तिसर्या घटनेत तीन लाख रुपये असलेली पिशवी घेऊन गाडीकडे पायी जात होते. या वेळी दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवरून पाठीमागून येऊन रोखरक्कम असलेली पिशवी पळवली. ही घटना शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र समोरील भाजी मार्केट परिसरात घडली आहे. गोपीचंद ठाकूर (वय 54) हे त्यांच्या मित्रासोबत फोनवर बोलत त्यांनी उभी करून ठेवलेल्या गाडीकडे रोखरक्कम घेऊन पायी जात होते. या वेळी दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवरून पाठीमागून येऊन रोखरक्कम असलेली पिशवी पळवून नेली. त्यामुळे ठाकूर यांनी याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.