कळंबोली : प्रतिनिधी
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दीपोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके व लक्ष्मण नरहरी इंदापूरकर यांनी 1860 साली राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. या वर्षी शाळा समिती अध्यक्ष देवदत्त भिशीकर व महामात्र गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी दीपोत्सव हा एक कार्यक्रम होता. पालक-शिक्षक संघांचे प्रतिनिधी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. या वेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी दीपनृत्य सादर केले. प्रमुख पाहुणे म्हणून तळोजातील श्रीकेम कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर के. जी. श्रीधर हे होते. ‘तमसो मां ज्योतिर्गमय’ या संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड, संजना बाईत, प्रियंका फडके यांनी सांगितले.