अलिबाग ः प्रतिनिधी
राज्यात मालेगाव, अमरावती, नांदेड येथे झालेल्या दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, दंगल घडविणार्या सूत्रधारांना अटक करा आणि रझा अकादमीवर बंदी घाला या मागण्यांसाठी सोमवारी (दि. 22) भाजपतर्फे अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्यातील दंगलीसंदंर्भात महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या भूमिकेचा या वेळी निषेध करण्यात आला. या आंदोलनात माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, सरचिटणीस मिलिंद पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, ओबीसी मोेर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा, युवा मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्ष अमित घाग, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, तसेच हेमंत नांदे, जगदिश घरत, अशोक म्हात्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपच्या अलिबाग येथील जिल्हा कार्यालयापासून मोर्चाने सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. यादरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. तेथेच आंदोलकांनी ठिय्या मांडला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आघाडी सरकारवर तोफ डागली. खोट्या व्हिडीओच्या आधारे दंगली घडवणारे मोकाट फिरत आहेत, मात्र स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे. अशा लोकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. आमदार रविशेठ पाटील आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश ठाकूर यांनीही आघाडी सरकारचा निषेध करीत दंगली घडवणार्यांवर कारवाईची मागणी केली. या दंगली घडवण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत करावी, दंगल घडवणार्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक करा, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घाला, स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, भाजप कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.