महापालिकेच्या विकासकामांचेही पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रत्येक रुग्णालयाची खासियत असते, त्याचप्रमाणे पनवेल उपजिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार करणारे प्रसिद्ध रुग्णालय व्हावे, अशी अपेक्षा बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 11) येथे व्यक्त केली. सिडकोचे अध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून उभारण्यात आलेले सुसज्ज पनवेल उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर रुग्णांसाठी सेवेदाखल झाले. या रुग्णालयाचे लोकार्पण आणि महापालिकेच्या विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन ना. चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच वाढत्या रस्ते अपघातांतील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले. रुग्णालयाची उभारणी ते पूर्णत्वापर्यंत आमदार ठाकूर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त गणेश देशमुख, आरोग्य उपसंचालक गौरी राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, डॉ. अरुणकुमार भगत यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
एखादे काम करायचे असेल तर त्याला मानसिकता आवश्यक असते. महापालिका निवडणुकीवेळी येथील जबाबदारी माझ्यावर होती. त्यादरम्यान रुग्णालयाला काय आवश्यकता आहे याची यादी केली आणि हे रुग्णालय लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आज त्याचे लोकार्पण झाले याचा आनंद होत असल्याचे सांगून या रुग्णालयात सर्व सुविधा असणे महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने उपजिल्हा रुग्णालयाला काय हवे याची जाणीव ठेवून सर्वांनी त्याप्रति योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले.
पनवेल येथे 30 खाटांचे रुग्णालय होते. सेवांचा तुटवडा होता. वाढती लोकसंख्या आणि प्रकल्प पाहता अद्यावत रुग्णालयाची आवश्यकता होती. ती आज पूर्ण होत आहे. येणार्या काळात यातील सुविधांमध्ये भर पडणार आहे. या रुग्णालयात पनवेलमधील प्रसिद्ध डॉक्टर मंडळीही सेवेतून योगदान देणार आहेत. मी त्याचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पनवेलमध्ये सुसज्ज रुग्णालय सुरू व्हावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर प्रयत्न करीत होते. 10 फेब्रुवारी 2009 रोजी 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी मंजुरी मिळाली. त्यासाठी तीन कोटी आठ लाख रुपये मंजूर करण्यात आले. 17 फेब्रुवारी 2011मध्ये तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल व परिसरातील वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवर होणार्या अपघातांची संख्या विचारात घेत पनवेलमध्ये सर्व सुविधांयुक्त रुग्णालय असावे, याकरिता ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्याची आणि ट्रॉमा सेंटरची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली. त्यानुसार शासनाने उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला प्रशासकीय मंजुरी देऊन यामध्ये जी प्लस दोन मजल्याची इमारत बांधण्यास मान्यता दिली. यात प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळ 2256.02 चौमी असून, एकूण इमारतीचे क्षेत्रफळ 6768.06 चौमी आहे. त्यासाठी 1691.96 लाख रुपये मंजूर करण्यात आले. फेब्रुवारी 2014मध्ये 799.49 लाख रुपये तांत्रिक मान्यता देण्यात आली. अंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामासाठी 51.67 लाख रुपये मंजूर करण्यात आले. अखेर या रुग्णालयाचे बुधवारी लोकार्पण झाले.
श्रेयासाठी नाही, तर जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो -आमदार प्रशांत ठाकूर
आपल्या भाषणात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, प्रजा हीच राजा समजून काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपजिल्हा रुग्णालयासाठी सदैव मदत करणारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मी आभार मानतो. या रुग्णालयासाठी जेव्हा जेव्हा निधी कमी पडला तेव्हा पालकमंत्री धावून आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. मी 2009 साली आमदार झालो. त्यानंतर येथील लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्णत्वास नेण्यासाठी सतत पाठपुरावा केला. नाट्यगृह, तालुका क्रीडा संकुल, न्यायालय, रुग्णालय अशा विविध महत्त्वपूर्ण सेवा सुरू झाल्या. मी श्रेयासाठी नाही, तर जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पनवेलच्या या रुग्णालयातून रुग्णांना दर्जेदार सेवा मिळेल आणि त्यासाठी नागरिक सहकार्य करतील, असा विश्वासही आमदार ठाकूर यांनी व्यक्त केला.
अशा असणार सुविधा
100 खाटांचे रुग्णालय व 20 खाटांच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये फिजिओथेरपी, अतिदक्षता विभाग, आहार विभाग, मनोविकृती विभाग, नेत्र शस्त्रक्रिया, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, माता वबालसंगोपन विभाग, प्रयोगशाळा, प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया विभाग, शवविच्छेदन केंद्र, रुग्णवाहिका, नवजात अर्भक काळजी कोपरा, एक्स-रे, न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्रतपासणी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटुंब कल्याण सुविधांबाबत समुपदेशन, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य, एकात्मिक समुपदेशन व उपचार, प्रतिबंधक उपचार केंद्र, रक्तपेढी आदी सुविधा असणार आहेत. टप्प्याटप्प्याने या सेवांमध्ये वाढ होणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper