Breaking News

रायगड सुरक्षा मंडळाचे निवड झालेले हजारो सुरक्षा रक्षक नोकरीच्या प्रतीक्षेत

पनवेल : वार्ताहर

रायगड सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून सर्वप्रकारची प्रक्रिया पूर्ण करून प्राप्त उमेदवारी अर्जांपैकी 3201 सुरक्षा रक्षकांची सुरक्षा मंडळात 26 डिसेंबर 2020 मध्ये निवड केली. 2019 मध्ये यासंदर्भात मंडळाने भरती प्रक्रिया राबविली होती, मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनदेखील हजारो मंडळांत निवड झालेले सुरक्षा रक्षक अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनासह खाजगी आस्थापना मंडळाने वेळोवेळी मागणी करूनदेखील सुरक्षा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना सहभागी करून घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

2019 साली रायगड सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या वेळी सुमारे 10,998 अर्ज मंडळाला प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर 5862 जणांची प्रथमदर्शनी निवड प्रक्रियेसाठी निवड झाली. मैदानी आणि शारीरिक चाचणी पूर्ण झाल्यावर 4050 जण पुढील भरती प्रक्रियेसाठी निवडले गेले. पोलीस पडताळणी, तसेच वैद्यकीय तपासणीत अंतिम 3201 उमेदवार निवडले गेले, मात्र यापैकी 400 ते 500 सुरक्षा रक्षकांची मंडळात निवड झाली. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी मंडळाने सेराईज टेक सोल्युशन प्रा ली या कंपनीला काम देण्यात आले होते.

या सर्व प्रक्रियेतून पार पडायला सुमारे दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र तरीदेखील अद्यापही जवळपास 2500 पेक्षा जास्त उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात रायगड सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष समीर चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply