Breaking News

कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलला पालकांनी लावले टाळे

दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक 2 मेपासून सुरू करणार उपोषण

कर्जत : बातमीदार : कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरिक्त गुण शाळेने मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी गुरुवारी (दि. 25) शाळेला टाळे ठोकले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पालक संघर्ष समिती 2 मेपासून शाळेच्या व्यवस्थापन विरोधात आमरण उपोषण सुरू करणार आहे.

कर्जत शहरातील इंग्लिश मीडियम स्कूलने 2019 मध्ये दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या अतिरिक्त विषयांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. 54 विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि 2 विद्यार्थ्यांचे गायन या विषयातील अतिरिक्त वाढीव गुण मुंबई बोर्डाला वेळेत कळविले गेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता पालक वर्ग संतप्त झाला आहे. पालकांनी संघर्ष समिती स्थापन करून जोरदार उठाव केला आहे. त्यांनी गुरुवारी शाळेत येऊन शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना धारेवर धरले. या वेळी पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक हे व्यवस्थित उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी टाळे आणून कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलला टाळे ठोकले. मुख्याध्यापक विनोद अडसुंदेकर आणि संस्थेचे सचिव श्रीकांत मनोरे यांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गुण मिळणार, याची खात्री शाळा व्यवस्थापन देत नसल्याने पालक वर्ग संतप्त झाला. हे पाहून कर्जत एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारिणी सदस्य विवेक जोशी, क्षमा काळे, देवीचंद ओसवाल हे तेथे पोहचले. शेवटी पालक संघर्ष समितीने आक्रमक होत दोन वेगवेगळे पर्याय अवलंबून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असून, 2 मे पासून शहरातील लोकमान्य टिळक चौकात उपोषण करण्याचे ठरले आहे. दरम्यान, शाळेचे मुख्याध्यापक विनोद अडसुंदेकर यांना घेऊन पालकांपैकी युसूफ खान, कैलाश पोटे हे वाशी येथील बोर्डाच्या कार्यालयात गेले, तर शाळेला कुलूप ठोकल्यानंतर सर्व पालक कर्जत पोलीस ठाण्यात पोहचले आणि निवेदन सादर केले.

पालकांच्या बैठकीत राजेंद्र जगताप, राजेश कलवार, राजेश लाड, रमाकांत जाधव, मृणाल कदम, शैला पाटील, लीना देशमुख, गोटीराम गायकवाड, रूपेश देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली. संस्थेचे अध्यक्ष झुलकरनैन दाभिया यांनी पालकांच्या भावना समजून घेत निवडणूक झाल्यानंतर आम्ही मंत्रालयात जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. तरीही पालक नाराज असून उपोषणावर ठाम आहेत.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply