Breaking News

कलोते मोकाशी धरण परिसरात फार्महाऊस मालकाचे अतिक्रमण

धरणपात्रातून माती आणि पाण्याची लूट

खोपोली : प्रतिनिधी : खालापूर हद्दीतील कलोते मोकाशी धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली घट अनेकांच्या फायद्याची ठरत असून, धरण पात्रात थेट पोकलन आणि डंपरचा मुक्त वावर सुरू झाला आहे. कर्जत जलसंपदा  विभागाकडे असलेले खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण 43 वर्षापूर्वी बांधण्यात आले. सिंचनासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांना हे धरण वरदान ठरले होते, मात्र अलीकडच्या काळात धरणातील पाण्याचा व्यावसायिक आणि खाजगी वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यातच धरण परिसराला फार्महाऊसचा विळखा पडला असून, काही फार्महाऊस मालकांनी थेट धरण पात्रात अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. सध्या धरणालगत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून त्यासाठी धरणातील पाणी आणि मातीचा प्रचंड उपसा होत आहे. धरणातील गाळ काढण्याच्या नावाखाली माती काढून फार्महाऊस व इतर गृहप्रकल्पाला पुरविण्यात येत आहे. धरणातील शिल्लक पाणीसाठ्यात थेट फूटवॉल टाकण्यात आले असून, धरणातील पाणी फार्महाऊसमध्ये नेले जाते. खालापूर हद्दीतील अनेक गावांच्या पाणीयोजना या धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असून, अशाप्रकारे बेसुमार पाणी उपसा सुरू राहिल्यास शेती आणि पिण्यासाठी पाणी शिल्लक राहणार नाही.

धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात येणार्‍या पाण्यावर उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला पीक घेण्यात येत होते, मात्र आता कालव्यात एक वर्षा आड पाणी सोडण्यात येत असल्याने एक वर्ष शेती ओसाड राहते.

-कैलास पवार, शेतकरी, खालापूर

धरणातील गाळ काढण्यासाठी शासनाचे मुक्त धोरण असून रीतसर अर्ज देऊन गाळ काढता येतो. सध्या एका स्थानिकाला गाळ काढण्याची परवानगी देण्यात आली असून, त्या व्यतिरिक्त कोणी माती काढत असल्यास माहिती घेऊ.

-अजय कदम, अधिकारी, जलसंपदा व पाटबंधारे विभाग, कर्जत

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply