थकीत बिलामुळे महावितरणने कापली नळपाणी योजनेची वीजजोडणी
कर्जत : बातमीदार
लाखो रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने गुरुवारी (दि. 15) नेरळ नळपाणी योजनेची वीज जोडणी कापली आहे. त्यामुळे शुक्रवारी शहराच्या अनेक भागात पाणी पोहचले नाही. आणि ऐन पावसाळ्यात नेरळमध्ये पाणीटंचाई दिसून आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने 1998 मध्ये नेरळ गावासाठी नळपाणी योजना उभारली आहे. त्यात उल्हास नदीचे पाणी नेरळमध्ये आणण्यासाठी बोर्ले गावात उद्धभव केंद्र उभारण्यात आले आहे. या उद्धभव केंद्रातून पाणी उचलण्यासाठी वीज वापरली जाते. या वीज वापराचे देयक गेली काही महिने थकीत आहे. मे 2021 मध्ये हे देयक एक कोटींच्या पुढे गेले होते. मात्र थकीत वीज बिलांचा टप्पा निश्चित करून, थकीत बिलाची रक्कम 75 लाखांवर आणली होती.
12 जुलै रोजी नेरळ ग्रामपंचायतीने थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडे 15 लाखाचा धनादेश जमा केला होता. मात्र गुरूवारी महावितरण कंपनीने नेरळला पाणीपुरवठा करणार्या बोर्ले उद्धभव केंद्राची वीज जोडणी तोडली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नेरळमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
नेरळ ग्रामपंचायतकडे सध्या 53 लाखाचे थकीत बिल असून ते भरल्यानंतरच वीज जोडणी पुन्हा जोडली जाईल, अशी भूमिका महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने घेतली आहे.