अलिबाग : प्रतिनिधी
राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वसान दिल्यामुळे अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने 1 डिसंबरपासून पुकारलेला बंद स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्यात यावा किंवा वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत शिफारस केल्याप्रमाणे प्रतिक्विंटल 170 रुपये कमिशन मिळावे. ई-पॉझ मशीन नवीन व्हर्जनसह देण्यात याव्यात. रेशन दुकांनामध्ये दिला जाणारा निकृष्ट दर्जाचा जास्त कणी असलेला तांदूळ तपासणी करून अहवाल मागविण्यात यावा. ज्या कार्डधारकांना कोणत्याही योजनांर्तगत धान्य दिले जात नाही अशा कार्डधाराकांची गावनिहाय यादी तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावी, आदी मागण्या अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाने राज्य शासनाकडे केल्या होत्या.
राज्यातील रेशन दुकानदारांनी 1 डिसेंबरपासून दुकान बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. अन्नपुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्याशी 23 नोव्हेंबर रोजी आमच्या प्रतिनिधींनी चार्चा केली. त्या वेळी त्यांनी या सामस्या सोडविण्याचे आश्वसन दिले. त्यामुळे बंद स्थगित करण्याचा निर्णय घेताला आहे, असे डी. एन. पाटील यांनी सांगितले. संघटनेचे सेक्रेटरी चंद्रकांत यादव, रायगडचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदी या वेळी उपस्थित होते.