Breaking News

माथेरानला पर्यावरणपूरक वाहतूक सुरू करण्यासाठी सनियंत्रण समिती अनुकूल

कर्जत : बातमीदार

माथेरान हे वाहनमुक्त शहर असल्यामुळे प्रदूषण नाही त्यामुळे वेगळा नावलौकिक मिळालेले पर्यटनस्थळ माथेरानमध्ये पर्यावरण पूरक बदल घडत आहेत. येथील पर्यावरण जपत आता ई-रिक्षा वाहतूक सुरू करण्यासाठी सनियंत्रण समिती अनुकूल असून माथेरानचे पर्यावरण हे मुख्य वैशिट्य जपत हा बदल केला जाणार आहे. दुरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीतून हे संकेत मिळत आहेत.त्यामुळे येथील विद्यार्थी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

याबाबत सनियंत्रण समितीने याचिकाकर्ते सुनील शिंदे यांच्यासोबत चर्चा करून तेथील वाहतूक समस्या सोडवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने काल महत्त्वपूर्ण बैठक झाली. हातरिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती झालीच पाहिजे. त्यांना आरोग्यदायी व सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना कायद्याने दिलेला वाहतुकीचा अधिकार मिळाला पाहिजे, गॅस सिलिंडर टाकीसाठी दीडशे ते दोनशे रुपये जास्त मोजावे लागतात, फळ भाज्या, दूध पाणी सर्वच वस्तूंवर जास्त पैसे मोजावे लागतात. हे प्रश्न कायमस्वरूपी सुटले पाहिजेत, अशी मागणी याचिकाकर्ते सुनील शिंदे यांनी केली. यावर समितीचे सदस्य पर्यावरण खात्याचे डॉ. दिनेश कुमार, डॉ. जॉय ठाकूर, पर्यावरण तज्ज्ञ डेविड कार्डोझ, अध्यक्ष के. पी. बक्षी व सचिव तथा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सविस्तर चर्चा केली.

माथेरानची भौगोलिक रचना, येथील प्रचंड चढ उताराचे रस्ते व हे सर्व करताना रिक्षा चालक व घोडेवाले यांचा रोजगार बुडणार नाही याची काळजी घेत पर्यावरण पूरक व्यवसाय कसा निर्माण करता येईल याचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे मत समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी व्यक्त केले व काल झालेल्या बैठकीचा सविस्तर आढावा मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांनी समितीला उत्तम प्रकारे ई-रिक्षा तथा सीएनजीचे फायदे-तोटे समजून सांगितल्याने ते उपयोगी ठरले. नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनीदेखील पालिकेचे पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली आहे. या वेळी श्रमिक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, शिक्षक तथा वन समिती योगेश जाधव आदी बैठकीसाठी जिल्हाधिकारी दालनात उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply