मुरुड : प्रतिनिधी
मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी रविवारची सुट्टी साधून मोठ्या संख्येने पर्यटक काशीद किनारी स्थिरावले होते. वाहनांच्या मोठ्या रांगा समुद्र किनारी लागल्या होत्या. पर्यटक समुद्र किनारी मोठ्या संख्येने आल्याने मुरुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पर्यटक उंट स्वारी, घोडागाडी तर काहींनी समुद्रात बनाना रायडींग तर पॅरासेलिंग चा आनंद लुटला आहे. पनवेल, ठाणे, मुंबई व कल्याण येथील पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. काशीद समुद्र किनारा अक्षरशः पर्यटकांनी फुलून गेला होता. समुद्र किनारी सुरुंच्या झाडाखाली बहुसंख्य पर्यटकांनी आपल्या सोबत आणलेल्या भोजनाचा सुद्धा आनंद घेताना दिसत होते.
काशिदच्या समुद्र किनारीवरील सर्व स्टॉल वर मोठी गर्दी दिसत होती. विविध वस्तूंनी हे स्टॉल सजवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी दर शनिवार-रविवार पर्यटक येत असतात. आंतरराष्ट्रीय ठिकाण म्हणून काशीद किनारा सुप्रसिद्ध असल्याने परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने काशीद येथील स्थानिकांना मोठा रोजगार मिळाला असून त्यांचा आर्थिक स्थर सुद्धा उंचावला आहे.