Breaking News

रायगड विकास प्राधिकरणाच्या मदतीला ‘नाम’

काँग्रेस नेते माणिक जगतापांनी दिले देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद

महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून परिसरातील 21 गावांचा विकास होत असताना या गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नाम फाऊंडेशन काम करणार आहे. तशी घोषणा नाम फाऊंडेशनचे सर्वोसर्वा नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी (दि. 2) पाचाड येथे केली. या वेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार माणिक जगताप यांनी किल्ले रायगडच्या विकासासाठी 600 कोटी दिल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले.  
रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने पाचाड येथे शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, अनिकेत तटकरे, माजी आमदार माणिक जगताप, पंचायत समिती सभापती मालुसरे, नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
किल्ले रायगड परिसरातील 21 गावांपैकी प्रथम दोन गावांमध्ये नाम फाऊंडेशनच्या वतीने पाणीटंचाईवर काम केले जाईल व सर्वांची योग्य साथ मिळाली तर येत्या दीड वर्षात 21 गावांतील पाणीटंचाई दूर करू, असा विश्वास नाना पाटेकर यांनी व्यक्त केला. आमदार गोगावले यांना बैठकीला वेळेत यावे, असे खडेबोलही नानांनी या वेळी सुनावले, मकरंद अनासपुरे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन पाणी योजना आणि त्यांचे स्त्रोत आपल्याला शोधायचे आहेत. बाकी काम सोपे आहे, असे म्हटले.
रायगड विकास प्राधिकरणच्या माध्यमातून कोणकोणती कामे आणि पाण्याचे नियोजन कसे होणार आहे याचा आढावा छत्रपती संभाजीराजे यांनी घेतला. या वेळी माजी आमदार माणिक जगताप यांच्या वक्तव्याने बैठकीचा नूरच बदलून केला. त्यांनी रायगड विकास प्राधिकरणची स्थापना करून स्वराज्याच्या राजधानीच्या संवर्धनासाठी 600 कोटी देणार्‍या तत्कालीनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले, तसेच रखडलेला काळ जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केल्यास किल्ले रायगड परिसरातील 21 गावांसह संपूर्ण महाड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, असे सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply