Breaking News

पनवेल महानगरपालिकेची ऑनलाइन सर्वसाधारण सभा

  • ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय खर्चास मंजुरी
  • विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे अज्ञान; अरविंद म्हात्रेंचाही बालहट्ट

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेतील नियमित स्थायी आस्थापनेवरील 336 अधिकारी व कर्मचार्‍यांना 2020-21 या आर्थिक वर्षाकरिता 60 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी दोन लाख 33 हजार 211 एवढ्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात आली असून, उर्वरित 57 लाख 66 हजार 789 शिल्लक तरतुदीच्या रकमेमधून महापालिकेत कार्यरत 336 अधिकारी व कर्मचारी आणि नव्याने समाविष्ट झालेले ग्रामपंचायतीचे 311 कर्मचारी अशा एकूण 648 कर्मचार्‍यांना शिल्लक निधीतून पूर्वलक्षी प्रभावाने वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करण्यास पनवेल महानगरपालिकेच्या मंगळवारी (दि. 20) झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महापालिकेतर्फे नव्याने मालमत्ता कर लागू करताना नागरिकांना कशा प्रकारे सवलत देता येईल याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतला जावा, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या वेळी सूचित केले तसेच नितीन पाटील यांनी पुढील पाच वर्षे मालमत्ता कर लागू करू नये, अशी लक्षवेधी मांडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. याबाबत तशी नोटीसही सर्व सदस्यांना देण्यात आली होती. या सभेला महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि सभापती यांनाच सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी होती. असे असताना विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सभाशास्त्राचे अज्ञान दाखवून सदस्य अरविंद म्हात्रे यांना आपल्याऐवजी उपस्थित राहण्यास पाठविले. त्यांना महापौरांनी परवानगी नाकारली. आयुक्तांनीही विरोधी पक्षनेत्याऐवजी दुसर्‍या कोणी सदस्याला अशा प्रकारे सभेस उपस्थित राहाता येणार असे स्पष्ट केले. तरीही अरविंद म्हात्रे यांनी सभेस बसू द्यावे यासाठी गोंधळ सुरू ठेवला.
काही वेळाने विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हेही सभागृहात हजर झाले आणि त्यांनी आपल्याऐवजी अरविंद म्हात्रे यांना सभेला उपस्थित राहू द्यावे, अशी मागणी करीत गदारोळ केला. वास्तविक कोरोना काळात होत असलेल्या महापालिकेच्या सभेला स्वत: प्रीतम म्हात्रे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारीने उपस्थित राहणे आवश्यक होते, मात्र त्यांनी आपल्याऐवजी अरविंद म्हात्रे यांना पुढे केले. महापालिकेच्या सभेत नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय होत असतात. अशा सभेला प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थिती दर्शविणे गरजेचे होते, मात्र त्यांनी दुसर्‍याला पुढे केल्याने ते आपल्या कर्तव्याविषयी किती गंभीर आहेत हे दिसून आले. त्याचप्रमाणे स्वत:ला अभ्यासू समजणारे अरविंद म्हात्रे यांनीही सभागृहात बसण्यासाठी बालहट्ट सुरू ठेवला होता.
खरेतर या सभेला प्रीतम म्हात्रे हे सुरुवातीपासून हजर असते, तर त्यांच्यावर आणि सहकार्‍यांवर गोंधळ घालण्याची वेळ आली नसती. मुख्य म्हणजे इतर नगरसेवक व अधिकार्‍यांचा वेळ वाया गेला नसता, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय भवनाला मंजुरी
खारघर येथील प्रभाग क्रमांक 6, भूखंड क्रमांक 9, सेक्टर 8, क्षेत्र दोन हजार चौमी या भूखंडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बहुद्देशीय भवन उभारण्यात येणार आहे. समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जाती यांच्या कल्याणकारी योजनेसाठी महापालिकेच्या पाच टक्के महसूल निधी अंतर्गत भवनाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. या कामाला सभेत मंजुरी देण्यात आली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply