नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंच्या अधिकृत गणवेश आणि क्रीडा साहित्याचे अनावरण क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी भारताचे पथक 190 सदस्यांचे अपेक्षित असून, यात 100 क्रीडापटूंचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी या वेळी दिली.आतापर्यंत भारताचे 56 पुरुष आणि 44 महिला क्रीडापटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. 23 जुलैपर्यंत भारताचे आणखी 25 ते 35 खेळाडू पात्र होतील. त्यामुळे मार्गदर्शक आणि अधिकार्यांसह भारताचे पथक 190 सदस्यांचे होईल, अशी आशा बत्रा यांनी व्यक्त केली. क्रीडा मंत्रालयाच्या नियमानुसार क्रीडापटू आणि अन्य अधिकार्यांचे प्रमाण एक-तृतीयांशहून अधिक नसेल. अतिरिक्त अधिकार्याचा खर्च सरकारकडून केला जाणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. लि निंग आणि रेमंड्स यांनी भारताचा गणवेश आणि अन्य साहित्य पुरस्कृत केले आहे. या कार्यक्र्रमाला नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, रवी दहिया, सुमित मलिक आणि सीमा बिस्ला हे ऑलिम्पिकपात्र क्रीडापटू उपस्थित होते.