खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ काँक्रीटीकरणाचे काम करणार्या मजुरांना रविवारी (दि. 12) मध्यरात्री खाजगी बसने चिरडल्याने दोन जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणावळा येथून लग्नकार्य उरकून बस मुंबईला जात असताना रविवारी मध्यरात्री 1च्या सुमारास या बसने रस्त्यात काँक्रिटीकरण सुरू असलेल्या जागी सिमेंट बल्करला धडक दिली. त्याच वेळेस तेथे काम करणार्या मजुरांनाही ठोकरले. या अपघातात निलेश दशरथ कांबळे (28, खोपोली), जगदिश राज (50, जम्मू-काश्मीर) व मोहम्मद बबलू (28, बिहार) असे तीन जण ठार झाले. अपघातात एकूण चार वाहने बाधित झाल्याचे समजते. बसचालक व प्रवासीही किरकोळ जखमी झाले होते. त्यांना प्रथमोपचारानंतर पुढे पाठविण्यात आले.