- कंपनीवर कारवाई न करण्याचे निर्देश
- ठकसेन विवेक पाटलांची पाठराखण करणार्या शेकापवरील पनवेलकरांचा विश्वास उडाला
पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेतून कर्ज घेणार्याला व्यक्तीला त्याच कर्जाच्या फेर्यात गुंडाळून त्याला चोहोबाजूंनी लुबाडण्यात आल्याचे एक प्रकरण आता उच्च न्यायालयासमोर आले आहे. त्यामुळे कर्नाळा बँकेचे कर्तेधर्ते विवेक पाटील यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नावावर कर्ज दाखवून कर्नाळा बँक विवेक पाटील यांनी कशी बुडवली हेही स्पष्ट होत आहे.
विवेक पाटील यांनी कर्नाळा बँकेत केलेल्या या ठकसेनी उद्योगांमुळे शेकापचे नेते, कार्यकर्ते यांचे डोळे उघडायला हवे होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. आपल्याच पक्षाच्या (शेकाप)ताकदीवर उभी केलेली बँक आपल्याच कारनाम्याने धुळीस मिळवणारे विवेक पाटील आता अटकेत असूनही पनवेलमधील उरलासुरला शेकाप आजही विवेक पाटील यांच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यांचेच फलक अभिमानाने मिरवताना दिसतो ही बाब शेकापवर विश्वास ठेवणार्या पनवेल तालुक्यातील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
मुंबई उच्च न्यायालयासमोर एक प्रकरण आले. यात घाटकोपर येथील जैस्वाल एक्स्पोर्ट लिमिटेड या कंपनीने आपल्या गारमेंट व्यवसायासाठी दोन कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते तसेच कंपनीची कर्जत येथील 12 कोटी रुपये किमतीची 13 एकर जमीन तारण ठेवली होती. कंपनीने कर्जाचे हप्ते वेळोवेळी फेडले. आता फक्त 66 लाख रुपयांचे कर्ज कंपनीवर शिल्लक होते.
दरम्यान, कर्नाळा बँकेने बनावट कागदपत्रे आणि कंपनीचे खोटे रबर स्टँप बनवून कंपनीवरील कर्ज चार कोटी 40 लाख दाखवले आणि कंपनीला नोटीसही बजावली तसेच कंपनीच्या मालकीची 13 एकर जमीन अवघ्या तीन कोटींना विकली. तरीही कंपनीने घेतलेले आधी दोन कोटी 75 लाख आणि नंतर (बँकेने वाढविलेले) चार कोटी 40 लाख कर्ज फेडले नाही. म्हणून कंपनीला घरजप्तीची नोटीस पाठविली. त्यामुळे कंपनीने कर्नाळा नागरी सहकारी बँकेविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.
याबाबत कंपनीने मांडलेली बाजू ऐकून उच्च न्यायालयाने कर्नाळा बँकेला झापले असून कर्जदारावर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत तसेच 16 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे शेकापचीही उरलीसुरली अब्रूही धुळीला मिळाली आहे.