कर्जत : बातमीदार
एमएमआरडीएच्या माध्यमातून 123कोटी रुपयांच्या माथेरानमधील विकासकामांना सुरुवात झाली असून, त्यापैकी येथील वन विभागाच्या वाहनतळामध्ये काळ्या दगडींचे कंपाउंड टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे झाडांचे चांगल्या प्रकारे संवर्धन होणार आहे. याकडे वन विभागाने विशेष लक्ष देत आहे.
मागील सरकारच्या काळात माथेरानमधील विविध विकासकामांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून 123कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यात सहा कोटी रुपयांच्या पार्किंग सुशोभीकरण कामाचा समावेश असून या कामास सुरुवात झाली आहे. येथील वन विभागाच्या वाहनतळावर काळया दगडींचे कंपाउंडचे काम सुरू असून जंगल आणि वाहनतळ यांच्यामधून गॅबियन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम मजबूत असून, त्यामुळे झाडांच्या खोडांना आधार मिळणार आहे. एमएमआरडीए अभियंत्यांच्या निगराणीत होत असलेल्या या कामावर वन विभाग अंकुश ठेवण्याचे काम करत आहे. विकासकामाबरोबरच वृक्ष संवर्धन झाले पाहिजे असे वन विभागाचे मत आहे. यासाठी वन विभागाचे वनक्षेत्रपाल नारायण राठोड हे या कामावर लक्ष ठेऊन आहेत. वाहनतळ सुशोभीकरणा बरोबरच झाडांचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग ज्या सूचना करत आहेत त्याचे पालन एमएमआरडीएकडून होत आहे. त्यामुळे सुसज्ज वाहनतळा बरोबरच आजूबाजूच्या वृक्षांचे संवर्धन होणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
एमएमआरडीएच्या माध्यमातून माथेरानमध्ये होत असलेल्या विकासकामांपैकी वाहनतळ सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यात वाहनतळाच्या कंपाउंडचे काम काळ्या दगडाच्या गॅबियन करून होत आहे. गॅबियन हे झाडांच्या संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे जमिनीची धूपही थांबणार आहे. हे काम योग्य पद्धतीने व्हावे याकडे आमचे लक्ष आहे.
-नारायण राठोड,
वनक्षेत्रपाल, माथेरान