गुन्ह्यांतील वाहने, मोबाइल हस्तगत; नवी मुंबई पोलिसांची कारवाई
कळंबोली : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्यामार्फत नवी मुंबई शहरामध्ये नशा मुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत अमली पदार्थ खरेदी विक्री व व्यसन करणार्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले असून या सर्व प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. यात गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने नुकत्याच केलेल्या कारवाईत जवळपास साडेपाच लाख रुपये किंमतीचा चरस हा अमली पदार्थ तसेच गुन्ह्यात वापरलेली अॅक्टीव्हा व दोन मोबाइल हस्तगत केले आहेत.
पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहाय्यक निरीक्षक निलेश तांबे, गंगाधर देवडे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पवार, अंमलदार शशिकांत शेडगे, विष्णू पवार, प्रकाश साळुंखे, सचिन टिके आदींच्या पथकाला गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना खारघर येथील सेक्टर 30 मधील फीचर्स बिल्डिंगच्या शेजारी सापळा रचून दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये महेश नेत्रप्रसाद शर्मा (वय 35) व राहुल संतोष साहू यांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्याकडून 1010 हा ग्रॅम वजनाचा चरस याची मुळ किंमत पाच लाख पाच हजार हस्तगत करण्यात आला. तसेच त्यांच्याकडील अॅक्टिव्हा गाडी व मोबाइल जप्त करून दोघांविरुद्ध खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश तांबे हे करीत आहेत.
नवी मुंबई परिसरात ड्रग्स माफिया हे तरुणांना अमलीपदार्थांची विक्री करतात. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाने अशाप्रकारे अमली पदार्थांची घेवाण देवाण करणार्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. नशा मुक्त नवी मुंबई करण्यासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.