शेतकर्यांना दुबार शेतीचा फायदा नाही
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल सहा वर्षांपासून बंद पडल्याने धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकर्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच अवलंबून राहणे क्रमप्राप्त झाले आहे.
अंबोली धरण लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून 2015 पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकर्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. खारअंबोली धरणाची पाणी साठवणूक क्षमता प्रंचड आहे.कालव्याचे काम पूर्ण झाल्यास सुमारे 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकर्यांना पूरक व्यवसायाची संधी मिळणार आहे. अल्पभूधारक शेतकर्यांना धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यास शेतकर्यांना जोडधंदा मिळेल. त्यातून रोजगार मिळावा अशी त्यांची धारणा आहे.
गेली अनेक वर्ष आंबोली धरणातील कालव्यांची कामे रखडली असल्याने येथील स्थानिक शेतकर्यांना दुबार पीक घेता येत नाही. फक्त भात पीक घेऊन समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात विविध प्रकारच्या भाज्या व अन्य तत्सम पीक न घेतल्यामुळे त्यांची आर्थिक परस्थिती सुधारत नाही.
कालव्याचे काम प्रदीर्घ काळ रखडल्यामुळे येथील स्थानिक शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे.
मुरूड शहरातील 15 हजार लोकसंख्येला याच धरणांमधून पाणीपुरवठा होत आहे. या धरणाच्या शेजारी असणार्या ग्रामपंचायतींनासुद्धा याच धरणातून पाणीपुरवठा होत आहे.
या कालव्याची कामे पूर्ण झाली तर आगरदांडा, राजपुरी, आंबोली, शीघ्रे, तेलवडे आदींसह असंख्य गावांतील लोकांना दुबार शेतीचा फायदा घेता येणार आहे. डावा तीर कालवा तेलवडेपर्यंत व उजवा तीर कालवा खोकरीपर्यंत गेल्यास शेतकर्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मागणी केली जात आहे.
अंबोली धरणाचा शुभारंभ सन 2009 मध्ये झाला. आतापर्यंत त्यासाठी शासनाचे सुमारे 29 कोटी रुपये खर्च झाले आहेत. स्थानिक शेतकर्यांना दुबार पीक घेऊन सदरील पाणी पिण्यासाठी देण्याचे प्रयोजन होते. हे धरण मुरूडसह लगतच्या 12 गावांची जीवनवाहिनी ठरली असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायम स्वरूपी मिटली आहे. संपूर्ण मुरूड शहराला हेच धरण पाणी पाजत आहे. अंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम 7 .10 किमी पैकी 6.10 किमी अपूर्ण असून डाव्या तीर कालव्याचे 2.64 किमी पैकी 1.64 किमी काम अपूर्ण आहे.