पाली : प्रतिनिधी
मुंबई येथे होणार्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सुधागड तालुक्यातील चिवे आश्रमशाळेच्या दोन कबड्डी संघांची निवड झाली आहे. या संघांनी जिल्हास्तरीय
स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे.
अलिबाग येथील पीएनपी संकुलात झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्याच्या सर्व म्हणजे 15 तालुक्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. यात चिवे आश्रमशाळेच्या 14 व 17 वर्षे वयोगटातील मुलांनी प्रथम क्रमांक पटकाविला. 14 वर्षे मुलांच्या संघाने महाड संघाचा, तर 17 वर्षे मुलांनी कबड्डीचे माहेरघर असलेल्या यजमान अलिबाग संघाला अंतिम सामन्यात धूळ चारली होती. या संघांना राज्यस्तरीय कबड्डी प्रशिक्षक व आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक एस. एन. पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले, तर संघाचे व्यवस्थापक म्हणून आर. आर. खोपडे, एस. के. पाटील, आर. आर. गायकवाड यांनी काम पाहिले. विभागीय स्पर्धेसाठी कुलाबा आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र लिमये, आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक श्री. गुरव, शाळेचे शिक्षक-शिक्षिका, कर्मचार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.