Breaking News

कळंब-पाषाणे रस्त्यासाठी चार गावांचा सर्वपक्षीय लढा

सार्वजनिक बांधकाम खात्याला 600 सह्यांचे निवेदन

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून कळंब-पाषाणे-वांगणी या रस्त्याकडे पहिले जात आहे. या रस्त्यावरील अगणित खड्ड्यांमुळे परिवहन विभागाने एसटी बंद केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम हाती घेतली होती आणि आता त्या भागातील चार ग्रामपंचायतींमधील 600 ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले, मात्र ग्रामस्थांनी रस्त्याबाबत आता शासनाने हालचाल न केल्यास धरणे, उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाला कळंब येथून वांगणी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे. या रस्त्यावरून सुरू असलेली एसटी कर्जत आगाराने रस्ता खड्डेमय झाल्याने बंद केली आहे. तर खराब रस्त्यामुळे या भागातील असंख्य ग्रामस्थ हे पाठीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे रस्त्याबद्दल शासनाने लक्ष द्यावे आणि रस्ता नव्याने करण्यात यावा यासाठी या रस्त्याचा प्रामुख्याने वापर करणार्‍या चार ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम हाती घेतली होती. ग्रामस्थांनी कळंब, साळोख, पाषाणे आणि पोशीर ग्रामपंचायतींमध्ये सह्यांची मोहीम राबवून तब्बल 600 सह्या गोळा केल्या आहेत. त्या सह्यांचे निवेदन गुरुवारी (दि. 16) कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.

शासनाने कळंब-पाषाणे-वांगणी रस्त्यावर डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले नाही, तर ग्रामस्थ आधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्जत येथील कार्यालयाला घेराव घालतील आणि नंतर उपोषण करणार आहेत. त्यातून देखील मार्ग निघाला नाही, तर मात्र दररोज आळीपाळीने कळंब येथे कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे.

या वेळी सचिन शेळके, सचिन म्हसकर, जनार्दन म्हसकर, रमेश शेळके, समीर वेहले, यतीन आगिवले आदींसह सुरेंद्र विशे, माजी सरपंच फाईक खान, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश फराट, अनिस बुबेरे, आवेश जुवारी, शहनवाज पानसरे आदींनी एकत्र येत हे निवेदन दिले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply