पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांची पहिली फेरी (हिट्स डे) 6 व 7 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या स्पर्धांना संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी भेट देत शुभेच्छा दिल्या.
पहिल्या दिवशी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या, तर दुसर्या दिवशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये जवळपास चार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रत्येक विद्यार्थ्याला विविध तीन स्पर्धांमध्ये भाग घेता येणार होता. एवढ्या मोठ्या स्वरूपाची ही स्पर्धा अत्यंत शिस्त व नियोजनबद्ध रीतीने यशस्वी झाली.
विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांचा पालकवर्गही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होता. पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील उपस्थित होते. त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच खेळाडूंना पाठबळ देत मदत करत असतात. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी व आमच्या प्रभागातील रहिवासी स्वस्तिका घोष ही आज आंतरराष्ट्रीय स्तरावर टेबल टेनिसपटू म्हणून खेळत आहे याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांनाच आहे. स्कूलचा नावलौकिक वाढवण्याचे काम प्राचार्य राज अलोनी व त्यांचे सर्व सहकारी करत आहेत, असे मनोगतात सांगितले.
या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून 18 जानेवारी रोजी अंतिम फेरी होेणार आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे उपस्थित होत्या.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper