Breaking News

शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि अर्धी चड्डी!

एखादं जवळचं माणूस आपल्यापासून दूर गेलं की मनाला खूप वेदना होतात. प्रेम, युद्ध आणि राजकारणात सारं काही माफ असलं तरी जवळच्या व्यक्तीचा वियोग हा वेदनादायक असतो. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि अनेकांना बाळासाहेबांनी मोठे केले. त्यापैकी राज ठाकरे, छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी अनुक्रमे 2006, 1991 आणि 2005ला बाळासाहेबांना सोडून आपल्या स्वतंत्र वाटा चोखाळल्या.

बाळासाहेबांनी यापैकी एकालाही कमी प्रेम दिले नव्हते. अगदी मुलासारखे वागवले होते. राज तर अगदी पुतण्याच. छगन भुजबळ आणि नारायण राणे मातोश्रीवर मीनाताईंच्या हातचे जेवल्याशिवाय मातोश्रीच्या पायर्‍या उतरत नसत, पण या तिघांनी जेव्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेतून ‘जय महाराष्ट्र’ केला तेव्हा बाळासाहेबांना किती वेदना झाल्या असतील? बाळासाहेबांनी स्वत:च ‘माशांचे अश्रू कुणाला दिसत नाहीत’ असं म्हटलं होतं. नवी मुंबईचे गणेश नाईक यांचाही दुरावा बाळासाहेबांना दु:खदायक होता. आपण एखादे बीज रोवलं आणि त्याचा

भलामोठा कल्पवृक्ष बहरला आणि त्यावर कुणी घाव घालत असेल तर आपल्या अंगाची लाही लाही होणारच. आपल्या तळपायाची आग मस्तकात जाणारच. अगदी असंच दु:ख बाळासाहेबांना भोगावे लागले. अर्थात उद्धव आणि आदित्य यांनी या बहरलेल्या कल्पवृक्षाची अतिशय चांगल्या पद्धतीने निगा राखलीच.

सांगायचा मुद्दा असा की, बाळासाहेबांच्या शिवसेनेतून जसे भुजबळ, राज, राणे, नाईक बाहेर पडले तेव्हा जसं दु:ख बाळासाहेबांना झालं तसंच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक दु:ख शरद पवार यांना आताशी होऊ लागलंय. कारण काय तर सहकारमहर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांचे चिरंजीव, सहकारसम्राट, माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाटचालीमुळे. विजयदादा (विजयसिंह मोहिते-पाटील यांना सारे मित्र विजयदादा म्हणतात.) यांनी अकलूजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर हजेरी लावली आणि दादा आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात की काय? या केवळ कल्पनेनेच शरदरावांच्या समोर विविध प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आणि त्यांना विजयसिंह मोहितेंबद्दल चिंता वाटू लागलीय. या चिंतेतूनच पटकन शरद पवार यांच्या तोंडून एक वाक्य निघून गेले. विजयदादा, या वयात हाफ पँट घालून पाय आणि उघड्या मांड्या दाखवायची वेळ आणू नये! असे हे शरद पवारांचे वाक्य आहे. साहजिकच आहे शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील तसे समवयस्कच आहेत. दोन-चार वर्षे इथे तिथे. 1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळ या मुद्यावरून शरद पवार,  संगमा आणि तारीक अन्वर यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील, आर. आर. पाटील, जावेद खान अशी वसंतदादा गटाची नेतेमंडळी लगेचच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील झाली नाहीत. तासन्तास मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर विजयसिंह मोहिते- पाटील, आर. आर. पाटील, जावेद खान या काँग्रेसमधील वसंतदादा पाटील यांना मानणार्‍या नेत्यांनी शरद पवारांचा ‘हात’ पकडला आणि ‘हाता’वर ‘घड्याळ’ बांधले. शरदराव आज ऐंशीच्या घरात, तर विजयदादा पंच्याहत्तरीत आहेत. अत्यंत लहान मोठ्या भावाप्रमाणे पवार-दादा गेल्या 1999 पासून आजवर एकत्र राहिले. त्यामुळे विजयदादा यांचा वियोग पवारांना सहन होणे जरा कठीणच, पण म्हणून शरद पवार यांनी थेट विजयदादांना संघाच्या शाखेत पाठवून द्यावे?

शरद पवार ज्यांचे मानसपुत्र म्हणून ओळखण्यात येतात त्या यशवंतराव चव्हाण यांनी शंकरराव मोहिते आणि यशवंतराव मोहिते यांना काँग्रेसमध्ये आणले आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करीत शरद पवारांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आणले. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील भारतीय जनता पक्षाशी जवळीक करताहेत. रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपत प्रवेश करताहेत म्हटलं तर शरद पवार यांना वेदना होणारच, पण या वेदना होता होता पवारांनी दादांना थेट अर्धी चड्डी आणि मांड्या दाखवण्याची वेळ या वयात आणू नका, असं म्हणणं हे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. मुळात शरद पवार आणि अर्ध्या चड्डीचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भाजपचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. अगदी फेविकोलचा जोड असल्यासारखा, पण हल्ली काय झालंय शरदरावांना विस्मृती जडली असावी असं वाटतं. त्यामुळे त्यांना काही गोष्टींची मुद्दाम आठवण करून देण्याची गरज आहे. अर्थात या सर्व गोष्टी त्यांना स्मरत असतीलच, पण ते जाणूनबुजून तसं बोलतही असतील. प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारसाहेब, अर्ध्या चड्डीच्या पाठिंब्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्री झालात हे विसरू नका, असा मुँहतोड जबाब दिला.

यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र शरदचंद्र गोविंदराव पवार हे लहान वयात राजकारणात आले. 1975 साली आणीबाणी होती तेव्हा शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1977 साली काँग्रेस पक्ष सोडणार्‍यांची संख्या मोठी होती. पक्षनिष्ठेच्या गप्पा हाकणार्‍या नेत्यांनी काँग्रेस पक्ष किती वेळा सोडला आणि किती वेळा स्वगृही आले याची नोंद इतिहासात (राजकीय) आहे. वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांचे 17 एप्रिल 1977 रोजी महाराष्ट्रात सरकार आले. दादा मुख्यमंत्री तर तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते. या दादा-तिरपुडे सरकारात शरद पवार हे राज्यमंत्री होते. 1977 साली देशपातळीवर जनता पार्टी स्थापन झाली. भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, भारतीय लोकदल, संघटना काँग्रेस या चार पक्षांचा जनता पक्ष होता आणि याच वसंतदादा पाटील यांच्या सरकारातून बाहेर पडून शरद पवार यांनी वयाच्या 37व्या वर्षी समांतर काँग्रेस स्थापन केला आणि 18 जुलै 1978 रोजी पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करून समांतर काँग्रेस, जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्षांना या पुलोदमध्ये समाविष्ट करून स्वत: मुख्यमंत्री झाले. या जनता पक्षाला शरद पवार यांनी लोकशाहीचे पवित्र मंदिर असल्याची उपमा दिली. या जनता पार्टीत जसे सदानंद वर्दे, जगन्नाथ जाधव, भाई वैद्य यांसारखे समाजवादी होते, त्याबरोबरच उत्तमराव पाटील, इशू अडवाणी, डॉ. प्रमिला टोपले हे भारतीय जनसंघाचे नेतेही पवारांच्या मंत्रिमंडळात होते आणि शरद पवार हे या संघ स्वयंसेवकांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. वयाच्या 37व्या वर्षापासून शरद पवार यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अशा नेत्यांबरोबरचा प्रवास अगदी 2014पर्यंत बिनदिक्कतपणे सुरू होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना शरद पवार हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख होते आणि त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा होता. फार लांब कशाला 2014च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातले 10 वर्षांचे आणि राज्यातले 15 वर्षांचे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांना लोकांनी जबरदस्त फटका दिला आणि विरोधी पक्षात बसवले. त्यानंतर ऑक्टोबर 2014मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या सर्वांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. भाजप 123 जागा पटकावून 288च्या विधानसभेत सर्वांत मोठा पक्ष बनला. 145 जागा हव्या होत्या बहुमतासाठी. शिवसेना 63 जागा मिळवून विरोधी पक्षात बसली, अगदी 5 डिसेंबर 2014पर्यंत. त्यावेळी निव्वळ संघाच्या विचारधारेचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या अल्पमतातल्या सरकारला न मागता शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली. यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी 22 वर्षांत जेवढी बदनामी सहन करावी लागली नाही, तेवढी 22 दिवसांत सहन करावी लागली, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली होती. बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्या व्यासपीठावर गेले तेव्हा मोदी आणि पवार यांचे नाते गुरुशिष्याचे असल्याचे चर्चेत येत होते. आताही लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्हाला काय निकालानंतर भाजपलाच पाठिंबा द्यायचा आहे, असे राष्ट्रवादीतले नेते खासगीत बोलताना आढळतात. एवढे सारे असल्यामुळे शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांना दादा, या वयात तुम्हाला अर्ध्या चड्डीवर उघड्या मांड्यांत पाहायची वेळ येऊ नये, असे म्हणणे याला काय म्हणणार? अशा वेळी बर्‍याच मराठी म्हणी तोंडावर येतात. पण जाऊ द्या! पवारसाहेब विस्मृतीत गेले आहेत, काय करणार? मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात शरद पवारांची भाषणे ऐकताना अरे, हे कोण? शरद पवारच आहेत काय? असा प्रश्न पडतो. यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृतपणा शरद पवार यांनी आजीवन सोडू नये अशी अपेक्षा करायला हवी. होईल ना पूर्ण? पाहू या. नमस्ते सदा वत्सले मातृभूमी, असं म्हणताना कदाचित शरद पवारच पाहायला मिळतील.

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply