ना. नितीन गडकरींचे अभिवचन; मोहोपाड्यात विराट सभा
मोहोपाडा, खालापूर : प्रतिनिधी
जेएनपीटीच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. एचओसी कंपनीच्या जागेवर बीपीसीएलची उभारणी होत आहे. इस्रोचा प्रकल्पही कार्यरत आहे. या सर्व ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, असे अभिवचन केंद्रीय परिवहन मंत्री, विकासमूर्ती नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 26) मोहोपाडा येथे दिले. ते विराट जनसमुदायाला संबोधित करीत होते.
मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ मोहोपाडा येथील अचानक मैदानावर विजय संकल्प सभा झाली. त्या वेळी ना. नितीन गडकरी बोलत होते. देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर पुन्हा मोदी सरकारला सत्ता द्या, तसेच मावळमधून श्रीरंग बारणेंना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेस केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, खासदार व उमेदवार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, माजी आमदार देवेंद्र साटम, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी, सल्लागार बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, जेएनपीटीचे विश्वस्त तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, मिलिंद पाटील, शिवसेनेचे रामदास ठोंबरे, अनघा कानिटकर आदी उपस्थित होते.
आपले प्रतिस्पर्धी महाआघाडीचे नेते जनतेसमोर जात नाहीत. मोठ्या सभा घेत नाहीत. ते प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आणि आता मनी मीडियातून प्रचार करीत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केला. राष्ट्रवादीवाल्यांनी भ्रष्टाचार व घोटाळ्यांशिवाय काही केले नाही. त्यांच्या पापाचे व शापाचे भागीदार होऊ नका, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांनी अनेक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संसदेत पाठवू या असे सांगून, पवार घराण्यातील उमेदवार येथील जनता स्वीकारणार नाही, असे आमदार मनोहर भोईर म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय आणि देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष असल्याचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी यांनी म्हटले.
देशाची प्रगती नागरिक पाहात आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून विकास झाला असून, नागरिकांचे जीवन सुकर झाले आहे, असे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सांगितले.
रसायनी-पातळगंगा औद्योगिक क्षेत्रात पूर्वी सोन्याचा धूर निघत असे, परंतु काँग्रेस व त्यांचे साथीदार असलेल्या पक्षांच्या कचखाऊ धोरणामुळे येथील कारखानदारीला घरघर लागली, पण 2014पासून देशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर येथील स्थानिकांना आशेचा किरण दिसू लागला. या परिसरातील प्रकल्पग्रस्तांना येथील कारखान्यांत नोकरी मिळाली पाहिजे. येथे बीपीसीएलकडून हॉस्पिटल व्हावे, ज्या जमिनी शेतकर्यांच्या ताब्यात आहेत त्या त्यांना मिळाव्यात, अशा मागण्या जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी केल्या.
शेकापच्या जयंत पाटलांनी दलित चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला; तर सुनील तटकरेंनी दलित योजना बंद केली, असा आरोप करून शेकाप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या कारभाराची चौकशी ना. अनंत गीते यांनी करावी, अशी मागणी रिपाइंचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी केली.
या वेळी सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य जगदीश पाटील व त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे ना. नितीन गडकरी यांनी स्वागत केले.