Breaking News

’लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’

गोरगरीब विद्यार्थ्यांचा आधारवड

रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा जपत सातारच्या ज्ञानभूमीत सहा कोटी 27 लाख रुपये खर्चून लोकनेते रामशेठ ठाकूर भवनची उभारणी केली आहे. या भवनाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. 27) शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानिमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अठरापगड जातीतील गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातारा येथे श्रमविद्यापीठाची उभारणी केली. त्याच भूमीत, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थी भवन उभी करण्याची संकल्पना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मांडली. शिवाय या भवनसाठी येणारा सगळा आर्थिक खर्च एकट्याने करण्याची तयारीही दर्शवली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  शरद पवार यांनी तत्परतेने पाठिंबा दिला आणि या विद्यार्थी भवनला ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ असे नाव देण्यात यावे, अशी सूचनाही केली. चार मजली इमारतीत उभे राहिलेले हे भवन अंत्यत देखणे असून सर्व सोयीने युक्त आहे. हे भवन गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीत मोठा आधारवड ठरेल, अशा प्रतिक्रिया आता सर्व स्तरातून उमटत आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. 1971-72 या शैक्षणिक वर्षात त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बीए ला प्रवेश घेतला आणि कमवा व शिका योजनेत राहून, पडेल ती कामे करून, त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी काही दिवस शिक्षकाची नोकरी केली. पुढे ते व्यावसायिक बनले. व्यवसायात असतानाच त्यांनी समाजकारणाला आणि राजकारणाला सुरुवात केली. लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यार्थीदशेपासून ते आजतागायत रयत शिक्षण संस्थेच्या सोबत आहेत. संस्थेच्या ज्या शाखा अडचणीत आहेत, त्यांना त्यांनी भरभरून आर्थिक मदत दिली आहे. त्यामुळे संपूर्ण रयत परिवारामध्ये रामशेठ ठाकूर यांची ओळख रयतचा आधारवड म्हणून आहे. ही गोष्ट सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

जातपात, धर्म, पंथ, संप्रदाय, गट, तट यांच्या पलीकडे जाऊन लोकसेवेचे व्रत तनामनापासून जपणारे रामशेठ ठाकूर हे कर्मवीरांच्या विचारांचे निष्ठावान पाईक आहेत. कर्मवीरांच्या विचारावर, कार्यावर व भूमिकेवर अढळ निष्ठा ठेवून रामशेठ ठाकूर यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची ज्योत तेवत ठेवली आहे. एका अर्थाने कर्मवीरांच्या विचार, कार्याचा वारसाच ते पुढे घेऊन जाताना दिसतात. सामाजिक, शैक्षणिक काम करताना ते लोकभावना जाणतात आणि लोकभावनेचा आदर करून त्यांच्या कामाला प्राधान्य देतात. म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणतात. रयत शिक्षण संस्थेवर ते जीवापाड प्रेम करतात. स्वतःची शैक्षणिक संस्था असूनही रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील सर्व शाखांवर ते जातीने लक्ष ठेवतात. त्यांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व कार्यक्रमात, उपक्रमात, सुखदुःखात ते सक्रीय सहभाग नोंदवतात.कारण रयतला ते आपला परिवार मानतात. सातार्‍यात उभे राहिलेले लोकनेते रामशेठ ठाकूर भवन हे त्यांच्या ‘रयत’वरील प्रेमाचेच एक प्रतीक आहे.

रामशेठ ठाकूर हे लोकप्रियतेसाठी नाही तर लोकांसाठी काम करत राहतात. विद्यार्थीदशेत त्यांनी अनुभवलेले जीवन, प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण ते विसरत नाहीत. आपल्या मागील परिस्थितीची जाणीव ठेवून समाजोपयोगी व लोकोपयोगी कामे ते सातत्याने करत राहतात. शैक्षणिक कार्य करताना त्यांची भूमिका समतोल, सर्वसमावेशक आणि शैक्षणिक चळवळीला बळ देणारी असते. त्यांच्या या भूमिकेचा समस्त रयत परिवाराला आणि रयत सेवकांना मोठा अभिमान वाटतो.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं राहणं, वागणं, बोलणं, उठणं, बसणं अतिशय सौम्य प्रकृतीचे आणि लोकांना आपला माणूस वाटावा अशा बेताचे आहे. त्यांच्या वागण्या, बोलण्यात कोणताही बडेजाव नसतो. कसलीही दहशत नसते. कुठलाही आवेश आणि अभिनिवेश नसतो. सत्तेची, संपत्तीची एकही लकेर त्यांच्या ना वागण्यातून दिसते ना बोलण्यातून दिसते. कोणत्याही वयाचा, कोणत्याही पदावरचा माणूस त्यांना जेव्हा भेटायला जातो, तेव्हा त्याची ते आस्थेने चौकशी करतात. भेटायला आलेल्या माणसांचे प्रश्न, समस्या ते समजून घेतात. शक्य असेल तर तिथल्या तिथेच ते प्रश्न निकाली काढतात. त्यामुळे रामशेठ ठाकूर यांच्याकडे गेलेला माणूस भरल्या मनाने, समाधानाने परत येतो.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या दानशूरपणाचा स्पर्श केवळ रयत शिक्षण संस्थेलाच झाला आहे असे नाही. तर त्यांनी कैक संस्थांना आर्थिक मदतीचा हात दिलेला आहे. त्यांची भूमिका दुजाभावाची नाही तर विकासाची आहे. सतत माणसांमध्ये रमणारे, गोरगरिबांच्या हाकेला धावणारे, संकटकाळात जनसामान्यांच्या पाठीशी उभे राहणारे रामशेठ ठाकूर ‘रयत’मध्ये शिकणार्‍या गोरगरीब मुलांच्या पाठीशीही ठामपणे उभे आहेत. याची प्रचितीच त्यांनी उभ्या केलेल्या ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’च्या रूपाने येत राहते.

लोकनेते रामशेठ ठाकूर गेली पाच दशके राजकारणामध्ये आहेत, मात्र त्यांनी समाजाच्या प्रश्नांनाच प्राधान्य दिले. पक्षीय मतभेद विसरून ते जनतेची कामे करतात. 1998 साली ते कुलाबा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. आजघडीला त्यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर सलग तीन वेळा पनवेल मतदारसंघातून निवडून आले आहेत, याच्या पाठीमागे त्यांनी केलेली लोकसेवाच कारणीभूत आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या सामाजिक कामामध्ये शिक्षणाला फार वरचे स्थान दिले. शिक्षणाचे सामर्थ्य आणि महत्त्व त्यांनी विद्यार्थीदशेतच ओळखले होते. ‘आज जो काही मी आहे, ते केवळ शिक्षणामुळेच आहे,’ असे आजही ते जाहीर कार्यक्रमात स्पष्टपणे सांगतात. शिक्षणाची महती ओळखणारा हा लोकनेता शिक्षण क्षेत्रासाठी भरीव स्वरूपाचे योगदान देत आहे, याचे विशेष कौतुक वाटते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली आणि त्या त्या संस्थांनी त्यांना पुरस्कारही बहाल केले, परंतु रामशेठ ठाकूर हे पुरस्कारासाठी कधीच काम करत नाहीत. त्यांचे प्रत्येक काम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून होत असते. आपल्या कामातून सामाजिक बांधिलकी जोपासणारा, वाढवणारा आणि रुजवणारा हा लोकनेता आहे.

कर्मवीरांच्या ज्ञानपंढरीत येऊन ज्ञानाचा बुक्का आपल्या कपाळी लावून, तो इतरांच्याही कपाळी लावण्यासाठी प्रयत्न करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आज सर्व रयत सेवकांच्या मनात सन्माननीय आणि आदरणीय आहेत. त्यांचे हे दातृत्व असेच कणाकणाने वाढत राहो आणि अंशाअंशाने जनतेच्या मनात झिरपत राहो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रागंणात उभे केलेले ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधारवड ठरेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सिंहाचा वाटा उचलेल यात कुणाच्याही मनात शंका नाही.

-डॉ. आबासाहेब सरवदे, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply