Breaking News

एक देश-एक पोलीस गणवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिसांच्या गणवेशावर भाष्य केले आहे. एक देश-एक पोलीस गणवेश या संकल्पनेवर राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी सकारात्मक चर्चा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 28) केले. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करीत होते.
कायदा आणि सुव्यवस्था एखाद्या राज्यापुरती मर्यादित नाही, कारण गुन्हेगारी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढत आहे. यामुळे राज्य आणि केंद्रातील यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे. जोपर्यंत या मुद्द्यांंवर पोलीस आणि केंद्रीय संस्थांकडून समान प्रतिसाद मिळत नाही आणि या विरोधात लढण्यासाठी ते एकत्र येणार नाहीत तोपर्यंत या समस्येला तोंड देणे अशक्य आहे, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
पोलीस हा राज्यसूची अंतर्गत येणारा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याने आपापल्या पोलिसांसाठी वेगवेगळा गणवेश ठरवलेला आहे, पण एक देश-एक पोलीस गणवेश या संकल्पनेवर राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी विचार करावा. यातून खूप लाभ होईल. गुणवत्ता सुधारली जाईल. देशातील कोणताही नागरिक देशात कुठेही गेला तरी त्याला गणवेशावरून पोलिसाला ओळखता येईल. गणवेशावर संबंधित राज्याचा एक टॅग असू शकतो, एक नंबर असू शकतो, पण पोलिसांची ओळख गणवेशामुळ सामन्यपणे ओळख होईल. मी याचा आग्रह करीत नाही, मी फक्त माझा विचार सांगतो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
दोन दिवसीय ऑनलाइन चिंतन शिबिर गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असून या शिबिरात पहिल्या दिवशी आठ राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसोबतच 16 राज्यांचे उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. शिबिरात पोलीस दलाचे आधुनिकीकरण, सायबर गुन्ह्यांचे व्यवस्थापन, न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर, भू-सीमा व्यवस्थापन, किनारी सुरक्षा, महिला सुरक्षा, अमली पदार्थांची तस्करी आदी विषयांवर मंथन केले जात आहे.
बनावट बातम्यांमुळे देशात वादळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे याबाबत सतर्कता बाळगावी लागेल. आपल्याला लोकांना काहीही फॉरवर्ड करण्यापूर्वी विचार करण्यास शिक्षित करावे लागेल, अशी सूचनाही पंतप्रधान मोदींनी या वेळी केली. राज्ये एकमेकांकडून शिकू शकतात, प्रेरणा घेऊ शकतात आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करू शकतात. ही राज्यघटनेची भावना असून आपले नागरिकांप्रति कर्तव्य आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply