महाड ः प्रतिनिधी
कत्तल करण्याच्या उद्देशाने चोरून आणलेल्या आठ जनावरांची टेम्पोतून वाहतूक करणार्या दोघांना महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ बैल, एक टेम्पो व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. अब्रार सज्जाद खान (वय 54, रा. गोवंडी, मुंबई) व समीर अशोक पवार रा. गोडाळे महाड अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याची माहिती महाड शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये आठ बैल असल्याचे निदर्शनास आले. या जनावरांच्या चारा, पाण्याचे कोणतीही सोय वाहनात करण्यात आलेली नव्हती, तसेच जनावरांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली नव्हती. हे आठ बैल चोरून आणण्यात आलेले होते. पोलिसांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी टेम्पो चालक व त्यासोबत असणार्या त्याच्या सहकार्याला अटक केली आहे. या टेम्पोतून वाहतूक होत असणारे प्रत्येकी आठ हजार रुपये किमतीचे आठ बैल, पाच लाख रुपयांचा टेम्पो व पाच हजार रुपयांचा मोबाईल असा सुमारे पाच लाख 69 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार सुशील पाटेकर यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद खोपडे अधिक तपास करीत आहेत.