Breaking News

प्रो कबड्डी : यूपी योद्धाची पाटणा पायरेट्सवर मात; तर पुणेरी पलटणची बाजी

बंगळुरू : वृत्तसंस्था

प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामाच्या चौथ्या दिवशीचा पहिला सामना हा पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा असा झाला. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या सामान्यात अखेर यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर 36-35 असा एका गुणाने विजय मिळवला. या सामन्यात यूपीचा प्रदीप नरवाल 12 गुण घेत सुपर रेडर ठरला. पाटणा पायरेट्सने शानदार बचाव खेळला, पण अखेरच्या क्षणी संघाने एका गुणाने सामना गमावला. प्रो कब्बडीच्या इतिहासात पाटणा आणि यूपीचे संघ आतापर्यंत एकूण आठ वेळा समोरासमोर आले होते. त्यापैकी चार वेळा पाटणाने बाजी मारली, तर तीन वेळा यूपीचा विजय झाला होता. याशिवाय एक सामना बरोबरोत सुटलेला होता. दुसर्‍या व अतिशय अटतटीच्या सामन्यात पुणेरी पलटणने बाजी मारली आहे. पुणेरी पलटण विरुद्ध तेलुगू टायटन्स असा हा सामना झाला. यामध्ये एका गुणाने पुणेरी पलटणने तेलुगू टायटन्सचा पराभव करत, आपला पहिला विजय नोंदवला. पुणेरी पलटणने शेवटच्या क्षणी 34-33 अशी तेलुगू टायटन्सला मात दिली. टायटन्सच्या सिद्धार्थ देसाई 15 गुणांसह सुपर रेडर बनला, तर पुणेरी पलटणसाठी असलम इनामदारने 8 गुण मिळवले. तर तिसरा सामना हा जयपूर पिंक पँथर्स आणि हरियाणा स्टीलर्समध्ये यांच्यात झाला. या दोन्ही संघानी आतापर्यंत या हंगामात विजय मिळवलेला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी लढले. यात जयपूर पिंक पँथर्सला यश आलं.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply