पनवेल : रामप्रहर वृत्त
न्यू इयर सेलिब्रेशनचे तरुणाईसह सर्वांनाच वेध लागले आहेत, परंतु कोरोनाचा नवा व्हेरिएंट असणार्या ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून नवी नियमावलीनुसार जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महसूल प्रशासनाकडून पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमांचे उल्लंघन करणार्या न्यू इयर पाटर्या, मास्कचा वापर न करणारे तसेच कोरोनाच्या नियमांचा भंग करणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील एकूण 71 ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये 71 पथके तैनात करण्यात आली आहे आहेत. या पथकांमार्फत मास्क परिधान न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, सामाजिक ठिकाणी गर्दी करणे, आदी कोविड अनुरूप वर्तन न करणारे नागरिक, आस्थापनांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या पथकांकडून न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर करडी नजर ठेवण्यात आली असून सदर पथके ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत तैनात झाली आहेत. विवाह सोहळे, बँक्वेट हॉल, रेस्टोरंट्स, न्यू इयर पार्ट्यांची ठिकाणे, फार्म हाऊसेस, आस्थापना, उद्याने, शॉपिंग मॉल, जिमखाना क्लब, नाईट क्लब, परमिट रूम, सिनेमागृहे, धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, कोचिंग क्लासेस, खाजगी कार्यालये आदी ठिकाणी कोविड अनुरूप वर्तन न झाल्यास महसुलच्या पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
दोन दिवसांत 16 हजारांचा दंड वसूल
कोविड नियमांचे उल्लंघन करणार्यांवर महसुलच्या पथकांकडून कारवाईस सुरुवात झाली असून दोन दिवसांत एकूण 16 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सोमवारी 17 ठिकाणी कारवाई करून 8500 रुपये व मंगळवारी 15 ठिकाणी कारवाई करून 7500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव पनवेलमध्ये वाढू नये म्हण् सहकार्य करावे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नव्या नियमावलीनुसार कोविड अनुरूप वर्तन न करणारे नागरिक आणि आस्थापनांवर अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई सुरू राहील. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी बाळगावी आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.
-विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल