- राज्यस्तरीय स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण समारंभ
- विजेतेपदासाठी एक लाख रुपये आणि मानाचा करंडक
पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत एकाहून एक सरस एकांकिका सादर होत असल्याने यंदाचा मानाचा अटल करंडक कोण पटकविणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये सुरू असलेल्या यंदाच्या या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 4) सायंकाळी 6.30 वाजता स्पर्धास्थळी अर्थात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी शुक्रवारपासून सुरू असून यामध्ये राज्यातून निवड झालेल्या 25 एकांकिकांचे सादरीकरण होत आहेत. या एकांकिकांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येते. उत्कृष्ट नियोजन, संयोजन, दर्जदार परीक्षण आणि पारितोषिके यांचा मिलाप असलेल्या या स्पर्धेतून आजवर अनेक कलाकार घडले आहेत. विनोदी कलाकार ओमकार भोजने हाही या स्पर्धेचा भाग राहिला आहे. यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनेताच्या सन्मान त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरला असून राज्यभरातून या स्पर्धेचे तोंडभरून कौतुक होत आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी जयंत सावरकर यांचा गौरव रंगभूमीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व रुपये 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख यांची, तर प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेते, लेखक व दिग्दर्शक अभिराम भडकमकर, अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक विजय गोखले, सुप्रसिद्ध अभिनेता भरत सावले, सुप्रसिद्ध उद्योजक विलास कोठारी, स्पर्धेचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रताप यांची आदरणीय उपस्थिती असणार आहे.
नाट्यचळवळ वृद्धींगत व्हावी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच देशाच्या विकासासाठी मोलाचे योगदान देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा अविरतपणे पुढे जात रहावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली.
दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो. त्यामुळे ही स्पर्धा राज्यात नावाजली असून उत्कृष्ट कामगिरी करणार्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रकमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रायोजक ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि., तर सहप्रायोजक नील ग्रुप आहे. अटल करंडक एकांकिका स्पर्धेत एकूण दोन लाख 75 हजार रुपये रक्कम स्वरूपात पारितोषिके असून पनवेलमधील लोकप्रिय नाट्यकलावंत व वेशभूषाकार कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट वेशभूषा हे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
अंतिम फेरीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पारितोषिक वितरणाच्या दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत डोक्यात गेलंय (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय-ठाणे), फ्लाइंग राणी (कलामंथन-ठाणे), लपंडाव (डॉ. पिल्लई कॉलेज-पनवेल), टिनीटस (कलरफुल माँक-मुंबई), तुंबई (सी. के. ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालय-पनवेल), डोन्ट क्विट (स्वप्नपूर्ती क्रिएशन्स-मुंबई), काहीतरी अडकलंय (गुरु नानक खालसा स्वायत्त्य महाविद्यालय-मुंबई) या उर्वरित एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.