Breaking News

भारताचा द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

 पहिली कसोटी जिंकून ‘विराटसेने’ची मालिकेत आघाडी

सेंच्युरिअन ः वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वर्षाची अखेर आनंदी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने 118 धावांनी ऐतिहासिक असा विजय साकारला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सेंच्युरियन मैदानावर भारताने कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड वगळता आफ्रिकेचा या मैदानावर पराभव करणारा भारत फक्त तिसरा देश आणि आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे.

पाचव्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेचे सहा गडी झटपट बाद केले. दुसर्‍या डावात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन, तर मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा डीन एल्गर आणि टेम्बा बावुमा जोडी मैदानात जमली होती. मात्र एल्गर 77 धावांवर असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. तो 21 धावा करून तंबूत परतला. डीकॉकपाठोपाठ वियान मल्डर बाद झाला. मल्डरने अवघी एक धाव केली. लगेचच मार्को जॅनसेन 13 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कागिसो रबाडाला आपले खातेही खोलता आले नाही. त्यानंतर लुंगी एनगिडी शुन्यावर बाद झाला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारताना सर्वबाद 327 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 197 धावा केल्या. त्यामुळे भारताला 130 धावांची आघाडी मिळी. दुसर्‍या डावात भारताने सर्वबाद 174 धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 304 धावांचे आव्हान दिले मात्र दक्षिण अफ्रिकेचा संघ सर्वबाद 191 धावाच करू शकला.

दक्षिण आफ्रिकेमध्ये भारताने मिळवलेला हा फक्त चौथा कसोटी विजय ठरला आहे. त्यामुळे या विजयामुळे टीम इंडियाच्या नावे हा विक्रम नोंदवला गेला असून कर्णधार विराट कोहलीसाठीदेखील त्याच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा विजय संस्मरणीय ठरला आहे. तब्बल सात वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियनवर कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केला आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply