महाड या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लाभलेल्या तालुक्यात एकही क्रीडांगण नाही, ही तर शरमेची बाब म्हणावी लागेल. महाडमध्ये मुलांना खेळण्यासाठी असलेल्या दोन मैदानापैकी एक चांदे मैदान आणि दुसरे भिलारे मैदानही ऐन पावसाळ्यात चिखल आणि गवताने व्यापले जाते. यातील भिलारे मैदानाकडे महाड नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याने या मैदानावर उनाड तरुणांचा वावर वाढला आहे. यामुळे मैदान परिसरात दारूच्या बाटल्या आणि गुटख्याची पाकिटे सरसकट दिसून येत आहेत. तर चांदे क्रीडांगण हेदेखील खाजगी शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. यामुळे शासकीय क्रीडांगण महाडमध्ये उपलब्ध नसल्याने लाडवली गावाजवळ क्रीडांगणासाठी जागा घेण्यात आली असली, तरी अद्याप तेथे क्रीडांगण होण्यास महाडकर नागरिकांना किती प्रतीक्षा करावी लागते, हा प्रश्नच आहे. महाड या ऐतिहासिक शहरात मोठ्या क्रीडांगणाची गरज आहे. सध्या शहरात चांदे क्रीडांगण हे कोकण एज्युकेशन या संस्थेच्या ताब्यात आहे, तर दुसरे भिलारे मैदान हे महाड नगरपालिकेच्या ताब्यात आहे. भिलारे मैदान शहरात असल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिक सकाळच्या सुमारास पायी चालण्याकरिता येतात. या मैदानाचा वापर अनेक सभा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीदेखील केला जातो. तर तरुणांची मोठी गर्दी खेळण्यासाठी होत असते. लहान मुलेदेखील सायकल चालवणे आणि खेळण्यासाठी याच मैदानाचा वापर करतात. या मैदानावर महाड नगरपालिकेने काही वर्षापूर्वी मोठा खर्च केला होता. संरक्षक भिंत, पहारेकरी चौकी, टेनिस कोर्ट, जॉगिंग मार्ग अशी सुविधा या ठिकाणी करण्यात आली, मात्र यातील टेनिस कोर्टच्या इमारतीचे काम अर्धवट राहिल्याने, तसेच धूळ खात पडून राहिले. शेजारील सरंक्षक भिंतदेखील जागोजागी तुटून गेली आहे. पहारेकरी चौकी आणि टेनिस कोर्ट वापराविना पडून आहेत. पालिकेचे नियंत्रण न राहिल्याने या चौकीच्या खिडक्या आणि दरवाजेदेखील तोडून टाकण्यात आले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मैदानाची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात मैदानावर गवत आणि चिखल तयार होतो. अपूर्ण अवस्थेत पडून असलेल्या टेनिस कोर्टच्या इमारतीमध्ये दारू ढोसणार्यांनी जम बसवला आहे. रात्री आणि दुपारच्या सुमारास या ठिकाणी गर्दी दिसून येते. याचा त्रास फिरावयास येणार्या ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना होतो. मैदानाच्या आवारात नेहमीच दारूच्या बाटल्या आणि गुटख्याची रिकामी पाकिटे सर्रास आढळून येत आहेत. नागरिकांच्या तक्रारीवरून महाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून या बाटल्या उचलून नेल्या जातात, मात्र ठोस उपाय होत नसल्याने हे प्रकार सुरूच आहेत. भिलारे मैदानाकरितादेखील जवळपास 87 लाखाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र 57 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार आहे, असे सांगितले जात असले, तरी आजतरी हे मैदान म्हणजे खेळाच्या लायक नाही. महाड नगरपालिकेच्या वतीने स्व. माणिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून भव्य क्रीडांगण उभे राहणार होते. याकरिता शहरालगत एसटी स्थानकाच्या परिसरात असलेली जागा आरक्षित केली होती. सुमारे 8.50 एकर क्षेत्र या क्रीडांगणासाठी आरक्षित आहे. 230 मीटर लांबी आणि 190 मीटर रुंदी असलेल्या या क्षेत्रावर भव्य असे क्रीडांगण भविष्यात उभे राहील, मात्र याकरिता अद्याप तरी निधी प्राप्त झालेला नाही. महाड तालुक्यासाठी क्रीडांगण नसल्याने महाड नगरपालिकेची 11 एकर जागा क्रीडा विभागाला तालुका क्रीडांगणासाठी देण्यात आली आहे. यावर तालुकास्तरीय क्रीडांगण तयार होणार आहे, मात्र येथील कामदेखील अर्धवट अवस्थेत आहे. यामुळे महाडमधील नवोदित क्रीडापटू किंवा दररोज मैदानी खेळ खेळणार्यांची मोठी कुचंबणा होत आहे. महाड नगरपालिकेच्या आरक्षित जागेतील मैदानाच्या प्रकल्पाला शासकीय निधी लवकर प्राप्त होणे अपेक्षित आहे, तसेच शहरात अद्ययावत इनडोअर आणि आऊटडोर क्रीडांगणाचीदेखील गरज आहे.
-महेश शिंदे