Breaking News

कर्जत-मुरबाड मार्ग मृत्यूचा सापळा!; रात्रीचा प्रवास धोकादायक

कर्जत : प्रतिनिधी

राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कर्जत-मुरबाड या मार्गाचे काँक्रीटीकरण करीत आहे, मात्र हे काम सलग न करता अनेक ठिकाणी 10 मीटर लांबीचे भाग अर्धवट सोडण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहेत. दरम्यान, या मार्गावरील अर्धवट असलेल्या कामांच्या ठिकाणी ‘रस्ता बंद आहे’ असे फलक लावण्याचे सौजन्यदेखील एमएसआरडीसीने दाखविले नाही. कर्जत-मुरबाड रस्त्याचा 53 किलोमीटर लांबीचा रस्ता कर्जत तालुक्यातून जातो. या रस्त्याचा ठेकेदार नवी दिल्लीचा असून एमएसआरडीसीकडून सुपरव्हिजन केले जात आहे. स्थानिक प्रशासनाची कोणतीही जबाबदारी नसल्याने रस्त्याच्या कामात मनमानी केली जात असून कामाचा दर्जादेखील नित्कृष्ट असल्याचा आरोप होत आहे. या रस्त्यावर अखंडपणे काँक्रीटीकरण केले जात नाही. मध्येच 10 मीटरच्या भागात बांधकाम केले नाही. त्याबाबतची माहिती देणारे फलक एमएसआरडीसीकडून लावून घेण्यात आलेले नाहीत. परिणामी रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांचे खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. हे दहा मीटर लांबीचे रस्ते वाहनचालकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. कर्जतपासून मुरबाड हद्दीपर्यंत जागोजागी असे खड्डे असल्याने वाहनचालकांच्या मनात या रस्त्याने प्रवास करताना भीतीचे वातावरण असते. या खड्ड्यांच्या ठिकाणी रस्ते सलग करावेत आणि खड्डे असलेल्या सर्व ठिकाणी वाहनचालकांना सूचित करणारे रेडियम फलक लावण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांनी केली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply