रिलायन्स प्रकल्पग्रस्त तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलनकर्ते संतप्त
नागोठणे : प्रतिनिधी
येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू असताना सोमवारी दुपारी जगदिश वारगुडे या प्रकल्पग्रस्त तरुणाचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर आंदोलनकर्ते संतप्त झाले असून, आमच्या मागण्या कंपनी जोपर्यंत ऐकून घेत मान्य करीत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही, असा पवित्रा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. कोळसे-पाटील यांनी घेतला आहे.
जगदिश वारगुडे याचा मृतदेह रात्री उशिरा आंदोलनस्थळी आणण्यात येऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी अॅड. कोळसे-पाटील यांनी अजून किती जणांचा बळी अंबानी घेणार आहेत, असा सवाल व्यक्त केला तसेच राज्य सरकारला जर काही शरम वाटत असेल, तर त्यांनी राजधर्म निभावतानाच 25 दिवस चालू असलेल्या नागोठण्यातील आंदोलनाकडेसुद्धा लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. माझे स्वतःचे प्रेत येथून निघाले तरी चालेल, मात्र मागण्या झाल्याशिवाय येथून कोणीही उठणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि रुग्णवाहिकेबरोबर ते पनवेलकडे रवाना झाले. मृताच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊन पोलिसांच्या सल्ल्यानुसार मृतदेह शवागृहात ठेवण्यात आला आहे.