मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील बोर्ली एसटी बसस्थानक परिसरातील सरकारी जागेवरील अतिक्रमणे महसूल विभागाने जमीनदोस्त केली. या परिसरातील अन्य बेकायदेशीर बांधकामे हटवून ही जागा महसूल विभाग ताब्यात घेणार आहे. बोर्ली एसटी स्थानक परिसरातील गट क्रमांक 65 या सरकारी जागेत स्थानिक लोकांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले होते. बोर्ली स्थानक परिसरातील सरकारी जागेवर झालेली अतिक्रमणे तोडण्यात यावी, अशी मागणी वनिता पाटील यांनी केली होती. दरम्यान, सदरची जागा शासनाची असल्याने ती ताब्यात घ्यावी, असा निर्णय लोकायुक्तांनी दिला होता. त्यानुसार महसूल विभागाने बोर्ली एसटी स्थानक परिसरातील सरकारी जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. या वेळी मुरूड तहसीलदार गोविंद वाकडे, निवासी नायब तहसीलदार रवींद्र सानप, मंडळ अधिकारी लक्ष्मण शेळके, बोर्ली तलाठी अमृत चोगले, रेवदंड्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोकराव थोरात व हवालदार श्री. कवळे व श्री ठाकूर आदी उपस्थित होते.