Breaking News

रुग्णवाढीने आरोग्य व्यवस्थेची कसरत

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित उपचाराधीनही अधिक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण वाढत आहेत. शहरात कोरोनाबाबत बेफिकिरी सुरूच असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता पालिका प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे ऐवढ्या मोठ्या रुग्णसंख्येसाठी आरोग्य सुविधा पुरवताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे. नवी मुंबई शहरात 11 डिसेंबर रोजी दैनंदिन कोरोना रुग्ण 31 तर उपचाराधीन रुग्ण 292 इतके होते. महिनाभरात हे चित्र बदलले असून मंगळवारी नवी मुंबईत दैनंदिन रुग्ण 1873 तर उपचाराधीन रुग्ण 16,578 इतके झाले आहेत. यामुळे पालिकेच्या आरोग्य सेवेवर ताण आला असून सुविधांमध्ये वाढ करावी लागत आहे.

नवी मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील आरोग्य व्यवस्था कमी पडल्यानंतर पालिका प्रशासनाने दुसर्‍या लाटेत मोठया प्रमाणात आरोग्य सुविधांत वाढ केली होती. तरीही रुग्णवाढीच्या काळात रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली तर पूर्वतयारी असावी असा आंदाज बांधत पालिका प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र या लाटेत प्रशासनाचे अंदाजही फोल ठरत असल्याचे दिसत आहे. महिनाभरापूर्वी शहरात करोनाची परिस्थिती अगदीच आटोक्यात होती. दैनंदिन रुग्ण संख्या ही 30 पर्यंत होती तर उपचाराधिन रुग्ण हे 300 पेक्षा कमी होते,  मात्र त्यानंतर हळूहळू रुग्णवाढ होत शहरातील सर्व चित्र बदलले आहे. आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले आहेत. नवी मुंबईत मंगळवारी 1873 नवे कोरोना रुग्ण आढळले एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 28 हजार 251 पर्यंत गेली आहे. तर शहरात उपचाराधीन रुग्ण हे 16,578 इतके झाले आहेत. यात 10226 रुग्ण घरीच उपचार घेत असून 6311 रुग्णांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत.

कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली असून दिवसाला 15 हजारांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून पालिकेच्या आरोग्यसेवेवर पुन्हा ताण आला आहे. समूह संसर्ग सुरू आगामी काळात उपचाराधीन रुग्णांची संख्या 25 हजारांच्या घरात जाण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने एकीकडे रुग्णशय्या वाढवल्या जात असून अतिरक्त कोरोनायोद्ध्यांचीही पालिकेला आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पालिकेने भरती प्रक्रिया सुरू आहे.

गर्दीच्या ठिकाणी राज्य शासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसविण्याचे सर्रास प्रकार सुरू आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी फारशी गांभीर्याने घेतलेली नाही. दिवसा गर्दी आणि रात्री मुक्तसंचार सुरूच आहे. त्यामुळे चाचणीपेक्षा रुग्णसंख्या चार पट असण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करत असून पालिकेला नागरिकांनी करोना नियमावली पाळून योग्य ते सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

-प्रमोद पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply