खालापूर : प्रतिनिधी
सहजसेवा फाउंडेशन या संस्थेने खालापूर तालुक्यातील महड येथे वीटभट्टी कामगार व मजुरांच्या मुलांसाठी निसर्ग शाळा सुरू केली आहे. वावोशी येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. प्रदीप नथुराम पाटील यांनी या शाळेतील मुलांची रविवारी (दि. 2) वैद्यकीय तपासणी केली. सहजसेवा फाउंडेशनच्या निसर्ग शाळेच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते सरसावले आहेत. खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते सतीश येरूणकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने रविवारी या शाळेत येणार्या विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप केले, तर खोपोलीच्या वसंत देशमुख मेमोरिअल स्कूलच्या वतीने निसर्ग शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी डॉ. प्रदीप नथुराम पाटील यांनी मुलांची वैद्यकीय तपासणी केली. सामाजिक कार्यकर्ते अशोक ठकेकर, आकाश राजेंद्र फक्के, ज्योती भुजबळ व रामसापीर सेवा मंडळ यांनी शैक्षणिक साहित्यासाठी सहकार्य केले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांनी आभार मानले. वसंत देशमुख मेमोरिअल स्कूलच्या वतीने मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी काही खेळांचे सुद्धा आयोजन केले. फाउंडेशनच्या या निसर्ग शाळेला नकुल देशमुख, इशिका शेलार, जयश्री भागेकर, अखिलेश पाटील व बी. निरंजन यांचे शिक्षकरूपात योगदान लाभत आहे. निसर्ग शाळेत रविवारी झालेल्या कार्यक्रमाला वसंत देशमुख मेमोरिअल स्कूलच्या प्रशासकीय अधिकारी तेजस्वी देशमुख, मुख्याध्यापिका आश्विनी वाघुले, अर्चना सागळे, सुप्रिया सोरटे, स्मिता खेडकर अशोक ठकेकर, राजेंद्र फक्के, मोईन शेख, मोहन केदार, आकाश फक्के, रमेश पाटील, नरेश पालांडे, जयेश सुर्वे, सचिन शिंदे, संदेश माने आदी उपस्थित होते.