पोलादपूर : प्रतिनिधी
नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील 13 प्रभागांच्या मतदानानंतर दुसर्या टप्प्यातील चार प्रभागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि काँग्रेससोबतच भाजपने अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत आहे. प्रभाग 2मध्ये कल्पेश मोहिते (काँग्रेस), मनोज प्रजापती (शिवसेना), संभाजी माने (भाजप), अमित भुवड (काँग्रेस) आणि साहिल जाधव (शिवसेना) यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 8मध्ये सोनाली गायकवाड (शिवसेना), अनिता जांभळेकर (काँग्रेस), धुमाळ राजन (भाजप), समिधा महाडिक (काँग्रेस) यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग 10मध्ये शुभांगी चव्हाण (काँग्रेस), प्रतिक सुर्वे (भाजप), प्रसाद इंगवले (शिवसेना), अमित भुवड (काँग्रेस) यांचे, तर प्रभाग 14 मध्ये अंकिता जांभळेकर (भाजप), प्रतीक्षा भूतकर (काँग्रेस), प्राची सुतार (शिवसेना) आणि समिधा महाडिक (काँग्रेस) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी छाननी आणि वैध अर्जांची यादी सकाळी 11पासून प्रसिध्द होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 10 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असून 18 जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान आहे.