कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील महाविद्यालयात जाणार्या 15 ते 18 वयोगटातील 6774 विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार असून, त्यासाठी कर्जत तालुक्यात कशेळे, कर्जत आणि कडाव या तीन ठिकाणी सोमवारी (दि. 3) लसीकरण शिबिर घेण्यात आले. मंगळवारपासून तालुक्यात नऊ ठिकाणी 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार असून केवळ आठ दिवसांत हे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. कर्जत तालुक्यातील 6774 विद्यार्थ्यांची नोंद कर्जत तालुका आरोग्य विभागाकडे असून सोमवार पासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यास प्रारंभ झाला. कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यास सुरुवात झाली. तालुक्यातील कर्जत उपजिल्हा रुग्णालय, कशेळे ग्रामीण रुग्णालय आणि कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या तीन ठिकाणी 700 जणांचे लसीकरण करून घेण्यात आले. तालुक्याच्या ग्रामीण भागातील लसीकरणाचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांनी तर शहरी भागाचे नियोजन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी केले आहे. सोमवारी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संगीता दळवी तसेच आरोग्यसेविका अरुणा येलवे, द्वारका जाधव यांनी तर कडाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. अरुणा भांबरे, ऋतुजा पाटील यांनी लसीकरण केले. मंगळवारपासून नेरळ, कळंब, कडाव, मोहाली, खांडस, आंबिवली या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि कशेळे ग्रामीण रुग्णालय, कर्जत उपजिल्हा रुग्णालय आणि माथेरान येथील बीजे हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्रे उघडण्यात येणार आहेत.