माणसाला एकवेळ स्वतःचा जोडीदार निवडता येतो, पण शेजारी निवडता येत नाही. तो नशिबात असेल तसा स्वीकारावा लागतो अशा आशयाची इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे. त्याचा अनुभव गेली पन्नासहून अधिक वर्षे भारताने घेतला आहे. आपला शेजारी चीन याच्या रूपाने एक जुनी डोकेदुखी पुन्हा एकदा ठणकू लागली आहे असे दिसते. गेल्या दीड वर्षामध्ये चीनने भारताविरुद्ध केलेल्या कुरापतींची यादी करायला घेतली तर ती बरीच लांबलचक होईल.
गलवान खोर्यातील तुंबळ लढाईनंतर भारत आणि चीन या उभय देशांमधील दुरावा कमी होण्याची चिन्हे नाहीत. वास्तविक चीनने भारताला बेसावध गाठून 1962 साली प्रचंड मोठा भूभाग बळकावला होता. त्यातील बराचसा भूभाग भारतीय सैन्याने परत ताब्यात घेतला असला, तरी शेकडो मैलांचा टापू आजही चीनच्या अखत्यारीत आहे. लडाख भागातील दुर्गम पहाडी इलाख्यातील प्रतिकूल वातावरणामध्ये भारतीय सैन्य आजही प्राणपणाने चिनी सैन्याशी मुकाबला करत आहे. गलवान खोर्यातील झुंजीनंतर लडाखमधील पँगाँग जलाशयाच्या नजीक चिनी सैन्याने भारताचा काही भूभाग कब्जा करून ठेवला होता. भारतीय पलटणींनी त्यांना दणका देऊन मागे पिटाळले तेव्हापासून उभय सैन्यामध्ये खडाखडी चालू आहे. भारत आणि चीनमधील लडाख क्षेत्रातील सरहद्द पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरली आहे. सरहद्दीची संदिग्धता नष्ट व्हावी आणि त्याबाबत उभयपक्षी सुस्पष्टता यावी यासाठी चर्चेची तयारी भारताने नेहमीच दाखवली. यासंदर्भात चीन आणि भारताच्या सैन्यदलांमध्ये यापूर्वी चर्चेच्या अनेक फेर्या पार पडल्या आहेत. चर्चेची आणखी एक फेरी लवकरच पार पडेल अशी चिन्हे आहेत. चर्चेद्वारे सीमाप्रश्न सोडवण्याबाबत दोन्ही देशांची परराष्ट्र मंत्रालये अनुकूल असतानाही प्रत्यक्षात रणभूमीवर वेगळ्याच घटना घडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी चिनी सैन्याने पँगाँग जलाशयावर एक मोठा पूल बांधल्याचे लक्षात आले. हा पूल चिनी भूमीतच उभारलेला असला, तरी त्या भागात तैनात असलेल्या भारतीय सैन्याला तोंड देण्यासाठी या पुलाची बांधणी करण्यात आली आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. पँगाँग जलाशय हा शेकडो किलोमीटर पसरलेला प्रचंड मोठा खार्या पाण्याचा जलाशय आहे. त्याचा दोन तृतियांश भाग चीन आणि तिबेटच्या परिसरात आहे, तर उर्वरित एक तृतियांश भाग भारताच्या हद्दीत आहे. याच जलाशयाच्या नजीकच्या भागामध्येच चिनी व भारतीय सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, गलवान खोर्यातील भागामध्ये चिनी सैन्याने स्वत:च्या देशाचा झेंडा फडकवल्याची छायाचित्रे अलीकडेच इंटरनेटवर प्रसिद्ध झाली. त्यावरून सध्या देशात काहूर उठले आहे. विशेषत: काँग्रेस पक्षाने चिनी झेंड्याचे निमित्त साधून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले, परंतु हा झेंडा वादग्रस्त भागात फडकवण्यात आलाच नाही. तो दुसर्याच कुठल्या तरी भागातील आहे ही वस्तुस्थिती काही तासांतच पुढे आल्यानंतर काँग्रेसच्या टीकाकारांची तोंडे बंद झाली. लडाख भागामध्ये चिनी सैन्याच्या कुरापती नेहमीच चालू असतात. या असल्या कुरापतींना तोंड देण्यास भारतीय लष्कर समर्थ आहे. काही दिवसांपूर्वी भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील काही भागाचा नकाशा हा चीनच्या अखत्यारीत असल्याचे दर्शवण्यात आले होते. चिनी सरकारचे हे कुटिल कारस्थान हाणून पाडण्यासाठी गरज आहे ती संयमी सामर्थ्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने असे संयमी सामर्थ्य भारताकडे आहे.