पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावाची काँग्रेस नेत्यांना इतकी प्रचंड अॅलर्जी आहे की मोदी हे नाव उच्चारताच त्यांचे माथे फिरते. याचेच प्रत्यंतर बुधवारी पंजाबमध्ये आले असे खेदाने म्हणावे लागेल. पंजाबमधील फिरोजपूर येथील सभेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांचा ताफा निघाला असताना हुसैनीवाला येथे तथाकथित किसान आंदोलकांनी रास्तारोको केला. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही एक गंभीर चूक आहे. पंतप्रधानांची सुरक्षा ही साधीसुधी बाब नव्हे.
विविध विचारसरणींचा संघर्ष हे लोकशाहीचे एक महत्त्वाचे सौंदर्यस्थळ आहे. भारतासारख्या खंडप्राय आणि महान लोकशाही देशामध्ये अनेक पक्षांचे लोक आपापल्या विचारसरणीनिशी झगडत असतात. परस्परांशी वितंडवाद घालत असतात. शेलक्या शब्दांचे आदानप्रदान होत असते. क्वचितप्रसंगी भाषेचा स्तरदेखील ढासळताना दिसतो. परंतु असे असले तरी विचारांचा संघर्ष हा विचारांनीच लढला जावा अशी बव्हंशी धारणा असते. त्यामध्ये द्वेष, तिरस्कार, हिंसा किंवा घातपात यांची सरमिसळ झाली की लोकशाहीचे गणित बिघडते आणि संपूर्ण व्यवस्थेचाच अराजकाकडे प्रवास सुरू होतो. सात वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी नावाच्या वादळाने काँग्रेस पक्षाची देशातील सत्ता पाचोळ्यासारखी उडवली. वर्षानुवर्षे सत्तेच्या सिंहासनावर ठाण मांडून बसलेल्या, एकाच परिवाराच्या भोवती घोटाळणार्या काँग्रेसजनांना भारतीय जनतेने एकदम बेदखल केले. असे काही घडेल असे त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हते. आज काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात बदल होण्याची नजीकच्या भविष्यकाळात तरी शक्यता नाही. त्याचाच प्रचंड राग काँग्रेस नेत्यांच्या मनात धुमसत राहिलेला दिसतो. याचेच प्रत्यंतर बुधवारी पंजाबमध्ये आले. पंतप्रधान मोदी सभास्थानी निघाले असता त्यांच्या मार्गात कथित आंदोलकांनी केलेल्या रास्तारोकोमुळे अखेर त्यांना दिशा बदलून भटिंडा येथील विमानतळ गाठावे लागले. तसेच फिरोजपूर येथील सभा रद्द करावी लागली. पंतप्रधानांना अतिविशेष सुरक्षा कवच असते. त्यांच्या दौर्यासाठी कमालीची काळजी घेतली जाते हे सर्वश्रुत आहे. एखाद्या राज्यात पंतप्रधानांचा दौरा असेल तर त्यांचे विशेष सुरक्षा कवच म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप तसेच गुप्तचर विभागाचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि संबंधित राज्याचे पोलिस दल यांच्यात समन्वय असणे आवश्यक असते. किंबहुना, पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या राज्याची देखील असते. पंजाबमध्ये मात्र बुधवारी वेगळे चित्र दिसले. सडकमार्गे फिरोजपूर येथे निघालेल्या पंतप्रधानांना शेतकरी आंदोलकांनी रोखले. त्यांच्या मार्गाची माहिती सार्वजनिक कशी झाली हा खरा प्रश्न आहे. इतकेच नव्हे तर या संपूर्ण मार्गावर पंजाब पोलिसांनी कुठलाच बंदोबस्त ठेवला नव्हता असे निष्पन्न झाले आहे. ज्या हुसैनीवाला क्षेत्रातून पंतप्रधानांचा ताफा मागे वळवावा लागला, तेथून पाकिस्तानची सरहद्द अवघ्या दहा किमी अंतरावर आहे. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधानांचा जीव धोक्यात घालण्याचे धाडस पंजाब सरकारला कसे झाले असा प्रश्न आता विचारला जात आहे. तो योग्यच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील घोडचूक लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठवली. भाजप कार्यकर्त्यांचा हा संताप स्वाभाविकच म्हटला पाहिजे. भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तेथील अधिकार्यांना सांगितलेे की भटिंडापर्यंत मी जिवंत पोहोचलो याबद्दल आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद कळवा. पंतप्रधानांच्या या तिरकस टोमण्यानंतर तरी काँग्रेसचे द्वेषाने भरलेले डोळे उघडतील का हा खरा प्रश्न आहे.