अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. जिल्ह्यात सहा दिवसात साडे तीन हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची वाढ वेगात होत असली तरी लसीकरण झाले असल्यामुळे परिस्थिती गंभीर होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे.
जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 रोजी 196 नवीन रुग्ण आढळले होते. त्यावेळी एकूण रुग्णसंख्या 773 होती. 2 जानेवारी रोजी 284 नवीन रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या 1003 होती. ही संख्या झपाट्याने वाढत असून 6 जानेवारी रोजी 1096 नवीन रुग्ण आढळले आणि एकूण रुग्णसंख्या 3557 वर पोहोचली. त्यामुळे चिंता वाढली आहे.
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या वर गेली आहे. गुरुवारी दिवसभरात एक हजार 96 नवे रुग्ण सापडले आहेत. पनवेलबरोबर अलिबाग, पेण आणि कर्जत हे तालुके रुग्णवाढीत आघाडीवर आहेत. सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या तीन हजार 557 वर पोहोचली आहे. त्यातच ओमायक्रॉनच्या 12 रुग्णांबरोबर डेल्टा व्हेरियंटचे तीन रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरी लसीकरणदेखील मोठ्या प्रमाणावर झाले आहे. जिल्ह्यातील 92 टक्के नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 72 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे तिसर्या लाटेत प्रादुर्भाव जास्त असला तरी परिस्थिती गंभीर होणार नाही, असा विश्वास प्रशासनाला आहे.
तिसरी लाट थोपवण्यासाठी शासनाने 40 कोटी निधी मंजूर केला असून काही निधी वर्गही केला आहे. यामध्ये ऑक्सिजन टँक, लहान मुलांचे आयसीयू, जनरल आयसीयू बनविले जाणार आहेत. यासाठीची साहित्य खरेदी लवकरच केली जाणार आहे. 100 खाटांची सोय असलेल्या जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयातही बेड संख्या वाढवली जाणार आहे. 50 बेड असलेल्या रुग्णालयांसाठी निधी उपलब्ध झालेला नसला तरी मागणी शासनाकडे प्रस्तावित आहे. एकंदरीत जिल्ह्यात तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी केली गेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड कॉल सेंटर उभारण्यात आले असून रुग्णांवर येथून लक्ष ठेवले जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड कॉल सेंटर
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. रुग्णांच्या हालचाली, त्यांची प्रकृती, लागणारी मदत याबाबत संपर्क साधून माहिती घेतली जाणार आहे.
इसीआरपी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य मिशनला निधी उपलब्ध झाला आहे. आवश्यक खरेदीसाठी काही निधी वितरीत केला आहे. भविष्यात नवीन कोविड सेंटर्स, लहान मुलांचे कोविड वॉर्ड, अतिदक्षता कक्ष सुरू केले जातील. कोविडचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी.
-डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकीत्सक, रायगड
कर्जतमध्ये सलग तिसर्या दिवशी कोरोना रुग्णांत वाढ
कर्जत : बातमीदार
तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसर्या दिवशी वाढ झाली आहे. तालुक्यातील एका डॉक्टरसह एका आश्रमशाळेची मुलगी आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकादेखील शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्यातील अनेक फार्महाऊस आणि रिसॉर्टमधील कामगारांना कोरोनाने आपले लक्ष्य केले आहे.
कर्जत तालुक्यात मागील दोन दिवस 25 हुन अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. तर शुक्रवारी (दि. 7) तब्बल 45 कोरोना रुग्ण आढळून आले. मात्र त्यात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण नाही.
नाताळ, थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागता निमित्ताने कर्जत तालुक्यातील काही दिवस मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. त्यानंतर फार्महाऊस, रिसॉर्ट तसेच माथेरानमधील हॉटेल्समध्ये काम करणार्या कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. माथेरानमधील चार हॉटेल्समधील कामगार कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील भालीवडी आश्रमशाळेची 16 वर्षीय विद्यार्थीनी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने शाळा व्यवस्थापना पुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका शिक्षिकेला कोरोना झाल्याने बोरिवली (ता. कर्जत) गावातील प्राथमिक शाळा बंद ठेवावी लागली आहे.
सोलनपाडा येथे असलेल्या विजयभूमी विद्यापीठामधील तिघांना कोरोना झाला आहे. तर कर्जत उपजिल्हा रुग्णालयामधील दोन आणि कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक अशा तीन कर्मचार्यांना कोरोना झाला आहे. तालुक्यातील एका मोठ्या हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांनासुध्दा कोरोनाने विळखा घातला आहे.