पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल कल्चरल असोसिएशन या संस्थेत हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा शनिवारी (दि. 11) व रविवारी (दि. 12) पनवेल कल्चरल असोसिएशनच्या सभागृहात झाली. राज्यभरातील एकूण 25 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रोख सात हजार 500च्या प्रथम पारितोषिकाची खारघर येथील नेहा पुरोहित मानकरी ठरली. स्पर्धेत तिने राग ‘जौनपुरी’ सादर केला होता. राग ‘चारुकेशी’ उत्कृष्टपणे सादर करणार्या फजल अब्बास जाफरी याने पाच हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक पटकावले. प्राजक्ता बर्हाटे हिला तृतीय क्रमांकाची विजेती घोषित करण्यात आले तर अश्विनी जोशी हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. याशिवाय शिवरंजनी हेगडे हिला विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सर्व स्पर्धकांना तबल्याची उत्तम साथ रामदास म्हात्रे आणि विनायक प्रधान यांनी केली. या स्पर्धेचे परीक्षण करणार्या प्रदीप नाटेकर आणि डॉ. कविता गाडगीळ यांनी स्पर्धकांना अत्यंत बहुमोल असे मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्यवाह जगन्नाथ जोशी यांनी परीक्षकांचा परिचय करुन दिला व स्पर्धेचा निकाल जाहीर केला. संस्थेचे कोषाध्यक्ष अजय भाटवडेकर यांनी स्पर्धेचे सुविहीत नियोजन करुन हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.